Mumbai News : आनंदावर विरजण! पाटील कुटुंब खाली कार्यक्रमात अन् अडीज तासानंतर घडलं विपरीत
Last Updated:
Mumbai Theft News : विले पार्ले येथे उघड्या फ्लॅटचा फायदा घेत चोरट्यांनी 4.75 लाखांचे दागिने चोरले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी कुटुंब बाहेर असताना ही चोरी घडली असून पोलिस तपास सुरू आहे.
मुंबई : मुंबईतील विले पार्ले परिसरात फ्लॅटमधून मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी कोणतेही कुलूप तोडले नाही तर मुख्य दरवाजाचा उघडा असल्याचा फायदा घेत थेट घरात प्रवेश केला आणि सुमारे 4 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने लंपास केले.
कार्यक्रमाला जाताना झालेली एक चूक
ही घटना सहार रोडवरील एका इमारतीत घडली आहे. या प्रकरणी 58 वर्षीय लक्ष्मण पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पाटील कुटुंब रात्री साडेआठच्या सुमारास घराबाहेर पडले होते.
घरातून निघताना मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, तर अर्धवट बंद होता आणि कुलूपही लावलेले नव्हते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उघडून त्यातील सोने-हिऱ्यांचे दागिने चोरून नेण्यात आले.
advertisement
घरी परतले तेव्हा समोर आलं धक्कादायक वास्तव
रात्री सव्वादहाच्या सुमारास पाटील कुटुंब घरी परतले असता घरातील कपाट अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले. दागिने गायब असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. उघडे घर ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे ताजे उदाहरण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:25 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : आनंदावर विरजण! पाटील कुटुंब खाली कार्यक्रमात अन् अडीज तासानंतर घडलं विपरीत










