महाराष्ट्र, कर्नाटकातील 22 जणांच्या ट्रेकर्सचा ग्रुप हिमालयात वाट चुकला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण अडकले
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी इथं गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे वाट चुकल्यानंतर पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. २२ जणांच्या ग्रुपमध्ये कर्नाटकमधील १८ तर महाराष्ट्रातील एक महिला आहे. त्यांच्यासोबत तीन शेर्पा होते.
उत्तरकाशीतील कुशलकल्याण सहस्रताल या हिमालयातील उंच ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी २२ जणांचा ग्रुप गेला होता. ते अडकल्याची माहिती समजताच भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरने बुधवारी मदतकार्य राबवलं. यात पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. अद्याप अडकलेल्या चार जणांचा शोध सुरू असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. मणेरी येथील २२ जणांचा गिर्यारोहकांचा ग्रुप २९ मे रोजी उत्तरकाशीपासून ३५ किमीवर असलेल्या ट्रेकसाठी गेला होता.
advertisement
बचावकार्यात बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी जे आजारी आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांना हेलिकॉप्टरने हलवण्यात आले. गिर्यारोहक जिथे अडकले होते ते ठिकाण ४१०० ते ४४०० मीटर उंच होते. गिर्यारोहकांचा ग्रुप ७ जूनला परतणार होता. पण त्याआधीच बेस कॅम्पपासून सहस्रताल इथं जाताना गिर्यारोहक रस्ता चुकले.
ट्रेक आयोजित करणाऱ्या संस्थेने २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. तर इतर लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य राबवण्यात येत असल्याचं सांगितलंय. यासाठी भारतीय हवाई दलाला उत्तराखंड प्रशासनाने मदतीसाठी विनंती केली होती. या बचावकार्यात वनखात्याचे पथक आणि एसडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2024 8:19 AM IST
मराठी बातम्या/देश/
महाराष्ट्र, कर्नाटकातील 22 जणांच्या ट्रेकर्सचा ग्रुप हिमालयात वाट चुकला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण अडकले