राजकारणाचा कोल्हापुरी पॅटर्न! प्रचाराचा पहिला नारळ इथंच का फुटतो? पाहा कारण..

Last Updated:

Kolhapur Election: राज्याच्या राजकारणात कोल्हापूरची नेहमीच चर्चा असते. शिवसेनेसह इतर पक्ष प्रचाराचा पहिला नारळ कोल्हापुरातच का फोडतात? याबाबत जाणून घेऊ.

+
राजकारणाचा

राजकारणाचा कोल्हापुरी पॅटर्न! प्रचाराचा पहिला नारळ इथंच का फुटतो? महाराष्ट्रात का होते चर्चा?

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : शाहू नगरी, कुस्ती पंढरी, अंबाबाईची करवीर नगरी अशी कोल्हापूरची ओळख महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आहे. कोल्हापूरची एक वेगळीच राजकीय ओळख देखील आहे. प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळेच अनेक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून करतात. तर कोल्हापुरातील राजकीय समिकरणे राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवतात, असंही बोललं जातं. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय घडामोडी चर्चेत आहेत. याबाबतच ज्येष्ठ पत्रकार कृष्णात चौगुले यांनी कोल्हापूरच्या राजकारणाचा पटच लोकल18 सोबत बोलताना मांडला आहे.
advertisement
शिवसेनेचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरातून
सध्याच्या काळात अनेक राजकीय पक्षांच्या प्रचाराची पहिली सभा कोल्हापुरात होते. मात्र, ही परंपरा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. 1986 मध्ये बाळासाहेब ठाकरे निवडणूक प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी बिंदू चौकात जाहीर सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. तेव्हापासून शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापुरातच फोडला जातो. हा पायंडा पुढेही कायम राहिला, असे चौगुले सांगतात.
advertisement
कोल्हापूरचं पुरोगामी राजकारण
कोल्हापूर हे नेहमीच पुरोगामी चळवळींचं केंद्र राहिलं आहे. त्याचे पडसाद राजकारणातही दिसतात. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेनं नेहमीच पुरोगामी विचारांच्या पक्षांना पाठिंबा दिल्याचे दिसते. त्यानंतर शिवसेना, भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षांनीही कोल्हापुरातून राजकीय रणशिंग फुंकायला सुरुवात केली. त्यामुळे कोल्हापूर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र ठरलं.
advertisement
कोल्हापुरातील राजकीय नेतृत्व
देशाच्या राजकाणात देखील कोल्हापूरचा वेगळा ठसा आहे. अगदी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्यानंतर दिवंगत खासदार सदाशिवराव मंडिलक, दिग्विजय खानविलकर, उदयसिंगराव गायकवाड यांनी देशाच्या राजकारणात मान होता. तर सध्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांचे राज्याच्या राजकारणात वर्चस्व आहे. हे सर्व नेते कोल्हापूरच्या विकासासाठी आणि निधी मिळवून विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.
advertisement
मतांच्या ध्रुविकरणाबाबत वेगळेपण
राज्यात निवडणुकांमध्ये जाती, धर्मावर ध्रुवीकरण होत असतं. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसला. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात असे ध्रुवीकरण कमी असेल. परंतु, काही प्रमाणात दलित आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण पाहायला मिळते. मुस्लिम समाज हा नेहमीच काँग्रेस धार्जिणा राहिल्याचे दिसते. राजकीय ध्रुविकरणाच्या बाबतीत कोल्हापुरात वेगळं चित्र असून कोल्हापूरचं राजकारण गोकुळ आणि सहकारी बँकेच्या भोवती फिरतं. त्यामुळे महाडिक आणि पाटील गटात संपूर्ण जिल्हा विभागला असल्याचं चौगुले सांगतात.
advertisement
तिसऱ्या आघडीच मूळ कोल्हापुरात
सध्याच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होतोय. हा प्रयोग कोल्हापुरातच झाला असं म्हणावं लागेल. कारण परिवर्तन आघाडीतील 3 प्रमुख नेत्यांपैकी स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आणि शेतकरी नेते राजू शेट्टी हे मुळचे कोल्हापूरचेच आहेत. तर ही आघाडी शिरोळ आणि हातकणंगले मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात आहे. या वेगळ्या प्रयोगाची चर्चाही राज्यात सध्या होताना दिसतेय.
advertisement
कोल्हापूरने जपलाय आंदोलनाचा वारसा ! 
कोल्हापूरला जसा राजकीय वारसा आहे तसाच आंदोलनाचाही वारसा आहे. या आंदोलनांचा परिणाम थेट राजकारणावरही होत असतो. असंच टोलविरोधी आंदोलन कोल्हापुरात झालं. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. त्यामुळे तत्कालिन सरकारला टोल माफ करावा लागला. सध्या निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झालं. तसेच राहुल गांधींनीही संविधान बचाव संमेलनाची महाराष्ट्रातील सुरुवात कोल्हापुरातूनच केली.
दरम्यान, वरील राजकीय घडामोडींचा विचार करता कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरते. त्यामुळेच अनेक राजकीय पक्ष प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून करतात. हीच परंपरा सध्याच्या काळातही कायम असल्याचं ज्येष्ठ पत्रकार कृष्णात चौगुले सांगतात.
view comments
मराठी बातम्या/Politics/
राजकारणाचा कोल्हापुरी पॅटर्न! प्रचाराचा पहिला नारळ इथंच का फुटतो? पाहा कारण..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement