उन्हाळी सुट्ट्यांसाठी ST चा मोठा निर्णय, 15 एप्रिलपासून पुण्यातून जादा बस
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
ST Bus: उन्हाळी सुट्ट्यांत प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातून 15 एप्रिलपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पुणे: उन्हाळी सुट्टी सुरू झाली की अनेक जण आपल्या गावी जात असतात. यामुळे रेल्वे स्थानक, बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीचा प्रवास सुखकर, वातानुकूलीत व्हावा यासाठी पुणे एसटी विभागाकडून 15 एप्रिलपासून जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
अतिरिक्त बससेवा
यंदा 300 ते 400 अतिरिक्त बस फेऱ्या नियोजित आहेत. स्वारगेट आगारातून बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर यांसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत. पुणे स्टेशन आगारातून दादर, तर शिवाजीनगर आगारातून औरंगाबाद, नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरीवली यांसाठी जादा बस उपलब्ध असतील.
advertisement
परिक्षांच्या वेळापत्रकामुळे गर्दी उशिरा वाढण्याची शक्यता
यंदा शाळांच्या परीक्षा 25 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. प्रवाशांची मोठी गर्दी त्या कालावधीनंतर वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी अगोदर आरक्षण करून सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने यंदाही 764 अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. 15 एप्रिल 2025 ते 15 जून 2025 या कालावधीत ही विशेष सेवा उपलब्ध असेल. दररोजच्या नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त चालवल्या जाणाऱ्या या बसमुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
advertisement
आरक्षणासाठी सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण करता येईल.
1) वेबसाईट: www.msrtc.maharashtra.gov.in
2) आरक्षण पोर्टल: https://npublic.msrtcors.com/
3) बसस्थानक आरक्षण केंद्रे: सर्व प्रमुख बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 28, 2025 9:57 AM IST