पुणे तिथे काय उणे...वकील तरुणाने पाळल्या गायी, मॉलमध्येही घेऊन जातो फिरायला
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
गायींमुळे घरात कायम सकारात्मकता असते, कुठूनही थकून आल्यावर लहान लेकरासारखं गायीला गोंजारलं की थकवा क्षणात दूर होतो आणि प्रसन्न वाटतं, असं ते म्हणतात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : शेतीपूरक व्यवसायांमधून अनेक शेतकरी बांधव चांगलं उत्पन्न मिळवतात. गायीच्या दुधापासून तर उत्तम कमाई होते. पण तुम्ही कधी फक्त आवड म्हणून गाय पाळल्याचं कोणाला पाहिलंय का, तेही शहरी भागात. अनेक घरांमध्ये कुत्र असतं, मांजर असते. त्या घरातली माणसं आपल्या प्राण्यांची अगदी कुटुंबातील एक सदस्य म्हणून काळजी घेतात. परंतु पुण्यातील एका घरातल्या तरुण मुलाने चक्क गाय पाळलीये. ही पुंगनूर जातीची देशी गाय आहे, जीची उंची असते साधारण अडीच फुटांपर्यंत. महत्त्वाचं म्हणजे हा तरुण पेशाने वकील आहे.
advertisement
पुण्यातील मार्केटयार्ड भागात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीत वकील अभिषेक जगताप राहतात. त्यांनी आपल्या घरात एक नाही, तर दोन गायी पाळल्या आहेत. या गायींमुळे घरात कायम सकारात्मकता असते, कुठूनही थकून आल्यावर लहान लेकरासारखं गायीला गोंजारलं की थकवा क्षणात दूर होतो आणि प्रसन्न वाटतं, असं ते म्हणतात.
advertisement
गायी घरातच राहत असल्यामुळे त्यांना सांभाळण्याचा खर्च तसा कमी येतो. तसंच अभिषेक यांच्या घरात लहान मुलगा असल्यामुळे त्यालाही गायींसोबत राहायला खूप भारी वाटतं. विशेष म्हणजे या जातीच्या गायी महाराष्ट्रात कुठेच मिळत नाहीत. अभिषेक यांनी त्या आंध्रप्रदेशच्या पुंगनूर गावातून आणल्या आहेत.
advertisement
अभिषेक सांगतात, 'माझ्याकडे दोन गायी आहेत. एक अडीच वर्षांची आणि दुसरी एक वर्षाची. लक्ष्मी आणि राधा अशी आम्ही त्यांची नावं ठेवली आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गायी आमच्यासोबत अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे राहतात. देवपूजा करताना, जेवण करताना त्या आमच्या शेजारी बसतात. आम्ही कुठे बाहेर फिरायला गेल्यावर त्यांना सोबत घेऊन जातो. तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने बघतात. आम्ही जेव्हा त्यांना मॉलमध्ये घेऊन जातो तेव्हा तर अनेकजण त्यांच्यासोबत फोटो काढतात. घरात गायी असल्यामुळे वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहतं.'
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 02, 2024 8:42 PM IST