नवमीला अंबाबाई देवीची श्रीदक्षिणामूर्तीरुपिणी मातेच्या रूपात पूजा; पाहा खास Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
श्रीदक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात अंबाबाई देवीची अश्विन शुक्ल नवमीची सालंकृत पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर, 23 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सवातील नवमीला कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची श्री श्रीदक्षिणामूर्तीरुपिणी माता रुपात पूजा बांधण्यात आली. श्रीदक्षिणामूर्ती हे भगवान शिवाचे साकार, ज्ञानस्वरूप रूप आहे. अशा श्रीदक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात अंबाबाई देवीची अश्विन शुक्ल नवमीची सालंकृत पूजा बांधण्यात आली.
काय आहे देवतेचे महत्त्व
सर्व आगमशास्त्रे तंत्रविद्यांमध्ये श्रीदक्षिणामूर्ती हे आदिगुरु- संप्रदाय प्रवर्तक आहेत. यांच्या उपासनेने सर्व विद्या, रोग निवारण, मोक्षप्राप्ती होते. दुर्गविकारक अविद्या आणि माया यांचा नाश करणारे, अर्थात मृत्युचक्र नष्ट करणारी देवता म्हणून यांचे मुख दक्षिण दिशेला असते. ज्ञान हे निरंतर चिरतरुण असते, म्हणून ज्ञानमय दक्षिणामूर्ती नित्य तरुण असतात. तर ज्ञान घेणारा विद्यार्थी हा 'वृद्ध' होतो; 'वृद्धाः शिष्याः म्हणून त्यांच्या सभोवती ज्ञानार्थी वृद्ध असतात. आद्य शंकराचार्यांचे श्रीदक्षिणामूर्ति स्तोत्र सुप्रसिद्ध आहे, अशी माहिती श्रीपुजकांनी दिली आहे.
advertisement
कशी साकारली आहे पूजा?
श्रीदक्षिणामूर्ती हे वटवृक्षाखाली ललितासनात व्याघ्रांबर किंवा मृगाजीनावर ध्यानमग्र बसलेले असून चतुर्भुज आहेत. भगवान दक्षिणामूर्ती आपल्या शिष्यांना मौनाने उपदेश करीत असून, त्यातूनच शिष्यांच्या सर्व शंकांचे समाधान होत आहे. त्यांचा उजवा हात व्याख्यान मुद्रेत असून उजव्या वरच्या हातात अग्नी किंवा दिवटी आहे. तर डाव्या वरच्या हातामध्ये जपमाळा आणि डावा खालचा हात हा वरद मुद्रेत आहे. तसेच त्यांच्या पायाखाली अपस्मार नावाचा राक्षस आहे. अपस्मार राक्षस हा भ्रम किंवा अज्ञान याचे प्रतीक आहे. अशा पद्धतीने अंबाबाई देवीची पूजा साकारण्यात आली आहे.
advertisement
ज्याठिकाणी निघाले रक्त तिथंच केली मंदिराची स्थापना, 208 वर्षांची परंपरा, ही आहे विशेष मान्यता
दरम्यान श्रीदेवी माता ही आदिशक्ती असून सर्व सृष्टी, विद्या- कला- अध्यात्माची जननी आहे; म्हणून ज्ञानरूपा श्रीदेवी मातेतील दक्षिणामूर्ती देवता तत्त्वाचे दर्शन घडवणारी महापूजा महानवमीच्या दिवशी बांधण्यात आली आहे. ही पूजा अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
October 23, 2023 8:11 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवमीला अंबाबाई देवीची श्रीदक्षिणामूर्तीरुपिणी मातेच्या रूपात पूजा; पाहा खास Video