घर असो की हॉटेल, महाराष्ट्रातलं असं गाव जिथे मटण-चिकन खातचं नाही!

Last Updated:

Vegetarian Village: महाराष्ट्रातील रेणावी गावाची ओळख शाकाहारी गाव अशी आहे. या गावात कुणीही मांसाहार करत नाही.

+
घर

घर असो की हॉटेल, महाराष्ट्रातलं असं गाव जिथे मटण-चिकन खातचं नाही!

प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली:  आपल्याकडे आहाराचं वर्गीकरण शाकाहारी आणि मांसाहारी असं केलं जातं. काही लोक शाकाहारी तर काही मांसाहारी असतात. पण एखादं संपूर्ण गावच शाकाराही असल्याचं तुम्हाला माहितीये का? सांगलीच्या खानापूर तालुक्यातील रेणावी हे 'शाकाहारी गाव' म्हणून ओळखलं जातं. घाटमाथ्यावरील रेणावी खरंच शाकाहारी गाव आहे का? काय आहेत त्याची कारणे? याबद्दल लोकल 18 च्या प्रतिनिधींनी रेणावी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.
advertisement
रेणावी या गावामध्ये नवनाथांपैकी एक असणाऱ्या रेवणनाथाचे देवस्थान आहे. जागृत मानल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी रेणावी या गावात पूर्वीपासूनच मांसाहार वर्ज्य आहे. याबद्दल सांगताना गावकरी सुरेश जाधव सांगतात की, “इथं मांसाहार चालत नाही. गावाच्या हद्दीमध्ये मांसाहार पूर्वीपासून टाळला जातो. गावाच्या वेशी बाहेर इतर समाज राहतो. इतर समाजातील काही लोक मांसाहार करतात. परंतु, मांसाहार करणारी कुठलीचं लोक इथं उबदारी येत नाहीत.”
advertisement
“अलीकडे एका व्यक्तीने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. पण त्याचा व्यवसाय चालला नाही. थोड्याच दिवसात त्याच्या पोल्ट्रीतले सगळे पक्षी मरून गेले. तसेच या गावात राहून मांसाहार करणाऱ्या लोकांची प्रगती होत नाही. कितीही धन-संपत्ती कमावली तरी ते सुखी राहू शकत नाहीत. श्रीनाथांकडून त्यांना कोणते ना कोणते शासन मिळते,” असा गावकऱ्यांचा समज असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.
advertisement
देव शिक्षा देईल ही भीती
रेणावी गावातील सगळे हिंदू लोक शाकाहारी आहेत. तर काही मुस्लिम बांधवही शाकाहारी आहेत. येथील श्री रेवणसिद्धनाथ लोकांचे श्रद्धास्थान आहे. श्रीनाथांवर लोकांची मोठी श्रद्धा असल्याने इथले लोक शाकाहारी आहेत. तसेच लोकांच्या मनामध्ये मांसाहार केला तर देव शिक्षा देतो याची देखील भीती आहे. पूर्वी तशी काही उदाहरणे घडल्याचेही गावकरी सांगतात. 79 वर्षाचे बापू शांताराम यादव-पाटील यांनी गावात घडलेल्या आणि ऐकलेल्या काही हकीकती सांगितल्या. “मांसाहार करणाऱ्या पाच-सहा लोकांना ऐकायला न येणं, डोळं जाणं, हाता-पायांना दुखापत होणं, अपघात होणं अशा घटना घडल्या आहेत. मग देवाची माफी मागून ती लोक शाकाहारी झाली," असं यादव-पाटील सांगतात.
advertisement
लग्नासाठीही शाकाहारी मुलगी
गावामध्ये लग्न ठरवण्यासाठी शाकाहार करणारीच मुलगी बघितली जाते. पूर्वी मांसाहार करत असली तरी लग्नानंतर मांसाहार सोडावा लागतो. मुलीची परवानगी असली तरच लग्नाची सुपारी फोडली जाते. तसेच रेणावी गावातील मुलगी लग्न होऊन परगावी देताना देखील मांसाहार खाणार किंवा बनवणार नसल्याची बोलणी आधीच केली जाते. ज्या घरामध्ये रेणावीच्या मुलींना जबरदस्ती मांसाहार खाण्यास, बनविण्यास किंवा खरखटे धुण्यास लावले, त्या घरामध्ये काही ना काही विपरीत घटना घडल्याचे यादव-पाटील यांनी सांगितले. अलीकडे मांसाहार करण्याचे प्रमाण वाढल्याने या गावातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
advertisement
परराज्यातही करत नाहीत मांसाहार
खानापूरचा घाटमाथ्यावरील या गावातील बरेच लोक सोने-चांदीच्या व्यवसायानिमित्त परराज्यामध्ये राहतात. यापैकी व्यावसायिक धनाजी यादव यांच्याशी संवाद झाला. तेव्हा त्यांनी 'मध्यप्रदेश मध्ये राहत असूनही मांसाहार करत नाही. इतकच काय तर मांसाहार करणाऱ्या लोकांच्या घरातील पाणी देखील पित नसल्याचे सांगितले. प्रवासामध्ये रेल्वेतील कोणतेही पदार्थ विकत घेऊन खात नाही असे देखील त्यांनी सांगितले.
advertisement
इंग्रजांना हाकललं
पूर्वी केव्हातरी या गावामध्ये इंग्रज कुटुंब राहायला आले होते. त्यांनी मांसाहारी अन्नपदार्थ शिजवले होते. तेव्हा गावातील लोकांनी त्यांना हकलवून लावल्याची हकीकत गावातील वृद्ध लोक आजही सांगतात. तसेच पूर्वी विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोट वापरली जात होती. पूर्वी मोट जनावराच्या कातडीपासून तयार केला जात होत्या. मोट बनवण्यासाठी जनावरांची कातडी वापरली जात असल्याने येथील लोक मोटेचे पाणी पित नव्हते. अलिकडे विजेवरील पंप आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याचेही गावकरी सांगतात.
गावची यात्रा शाकाहारीच
रेणावी गावामध्ये वर्षातून दोन-तीन यात्रा भरतात. परंतु, सर्व यात्रा या शाकाहारी जेवणावळींच्या असतात. पाहुणे-रावळे आले तरी देखील इथे शाकाहारी जेवणाने पाहुणचार केला जातो. गावामध्ये आणि गावाच्या आसपासच्या 8-10 किलोमीटरवर चिकनचे दुकानही पाहायला मिळत नाही. इतकेच काय तर हॉटेल आणि नाश्त्याच्या गाड्यावरही केवळ शाकाहारी पदार्थच विक्रीसाठी ठेवले जातात.
दरम्यान, नवनाथांपैकी एक असणाऱ्या श्री रेवणसिद्ध नाथाबद्दल असणारी अपार भक्ती आणि देव काहीतरी शिक्षा करेल याची भीती, हीच रेणावी गावच्या शहाकारी असण्याला मुख्य कारणे असल्याचे जाणवते. आहाराला शुद्धी आणि पावित्र्याशी जोडत आजही शाकाहारी असणाऱ्या रेणावी गावचे अनेकांना कुतूहल वाटते आहे.
(सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
घर असो की हॉटेल, महाराष्ट्रातलं असं गाव जिथे मटण-चिकन खातचं नाही!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement