शेतीतून भरघोस नफा कसा मिळवायचा? पीएम मोदींनी शेतकऱ्यांना दिला कानमंत्र
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
pm modi on farmer : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी “गटशेती आणि उच्च मूल्य पिके” हा नवा मंत्र दिला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी “गटशेती आणि उच्च मूल्य पिके” हा नवा मंत्र दिला आहे. त्यांनी सांगितले की, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करावी आणि अधिक किंमत असलेल्या पिकांवर भर द्यावा. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. या वेळी त्यांनी ३५,४४० कोटींच्या दोन मोठ्या योजना सुरू केल्या. यात ‘पीएम धनधान्य कृषी योजना’साठी २४,००० कोटी आणि ‘मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस’ या योजनेसाठी ११,४४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मोदी म्हणाले, “शेतकऱ्यांनी सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती एकदम सुरू करू नये. आधी थोड्या जमिनीवर प्रयोग करा आणि बाकी पारंपरिक शेती सुरू ठेवा. यामुळे अनुभव आणि आत्मविश्वास वाढेल.” त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय शेतीत नव्या कल्पना, तंत्रज्ञान आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. समूह शेती आणि उच्च मूल्य पिके यामुळे ग्रामीण भारत समृद्ध होईल.
advertisement
शेतकऱ्यांचे अनुभव प्रेरणादायी
कार्यक्रमादरम्यान विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या यशोगाथा सांगितल्या. एका महिला शेतकऱ्याने ‘पीएम किसान सन्मान योजने’मुळे तिला मूग शेती करता आली असे सांगितले. ‘सखी’ संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले की, २० महिलांपासून सुरू झालेला उपक्रम आता २०,००० महिलांपर्यंत पोहोचला असून १४,००० महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. यावर मोदी म्हणाले, “हा खरा चमत्कार आहे.”
advertisement
एका शेतकऱ्याने सांगितले की, पूर्वी तो हॉटेलमध्ये काम करत होता, परंतु सरकारच्या मदतीने आता त्याच्याकडे २५० गीर गायींची गोशाळा आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाने ५०% अनुदान दिल्याने त्याचा मोठा फायदा झाला. दुसऱ्या शेतकऱ्याने मत्स्यपालन क्षेत्रातील प्रगतीविषयी सांगितले. सरकारच्या सहाय्याने त्याने ३०० एकरवर शेती आणि मत्स्यपालन सुरू करून २०० लोकांना रोजगार दिला आहे.
advertisement
श्री अन्नाचा प्रचार
पंतप्रधान मोदी यांनी ‘श्री अन्न’ म्हणजेच बाजरी आणि ज्वारीसारख्या पारंपरिक पिकांच्या प्रचारावर भर दिला. “पाणीटंचाई असलेल्या भागांत या पिकांची जीवनरेखा आहे. जगभर श्री अन्नाची मागणी वाढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांना प्रोत्साहन द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
तरुण शेतकऱ्यांचे प्रयोग कौतुकास्पद
कार्यक्रमात जबलपूरच्या तरुण शेतकऱ्याने ‘एरोपोनिक’ पद्धतीने मातीशिवाय बटाट्याची शेती दाखवली. मोदींनी हसत त्याला “जैन पोटॅटो” असे संबोधले. हरयाणातील हिसार येथील शेतकऱ्याने “काबुली चणा” शेतीत यश मिळवले असून, प्रति एकर १० क्विंटल उत्पादन मिळत आहे. त्याने सांगितले की, तूर आणि मूगसारखी कडधान्ये घेतल्याने माती सुपीक राहते.
advertisement
एका मोठ्या शेतकऱ्याने १,२०० एकरवर “रेझिड्यू-फ्री काबुली चणा” शेती केली असून, गटशेतीमुळे बाजारभाव चांगला मिळतो आणि नफा वाढतो, असे सांगितले.
शेतकऱ्यांना मोदींचा संदेश
view comments“शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केली, तर उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. हेच आत्मनिर्भर भारताचे खरे बळ आहे,” असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 9:54 AM IST