परराज्यातून जाळीदार पोत्यांमध्ये नारळ बाजारात येत असून, नवीन आवक सुरू होताच किरकोळ दरात दिलासा मिळू लागला आहे. दसरा-दिवाळीच्या काळात किरकोळ विक्रीत नारळाचे दर 28 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून हेच नारळ आता 22 ते 32 रुपयांदरम्यान उपलब्ध होत आहेत. ठोक बाजारात नवीन नारळांचे दर 24 ते 30 रुपये प्रतिनग आहेत, तर जुन्या नारळांचे दर अजूनही 31 ते 32 रुपयांवर कायम आहेत.
advertisement
दरम्यान, नारळाचे दर वाढल्याने खोबरेल तेलाचे दरही वाढले होते. किरकोळ बाजारात खोबरेल तेल 450 रुपये प्रतिलिटरपर्यंत विकले जात असून, कंपनी पॅकिंगमधील एक लिटर तेलाचा दर 713 रुपयांपर्यंत गेला आहे. आता नारळाचे दर कमी होत असल्याने तेलाच्या किमती घसरण्याची अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.
नारळाला वर्षभर मागणी असली तरी नवीन नारळांची आवक वर्षातून दोन वेळा होते. पहिला हंगाम जुलै ते ऑगस्ट, तर दुसरा हंगाम डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. सध्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात झाल्याने बाजारात नवीन माल येऊ लागला आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत दरमहा पाच ते सहा लाख नारळांची उलाढाल होत होती. मात्र सध्या सण-उत्सव नसल्याने ही मागणी तीन ते चार लाखांनी घटली असून, महिनाभरात केवळ दोन लाख नारळ बाजारात मागविण्यात आले आहेत.
याशिवाय, नवीन शहाळ्यांचीही आवक सुरू झाली आहे. सध्या शहाळे प्रतिनग सुमारे 25 रुपयांना विकले जात असून, भाव कमी झाल्याने ग्राहकांची संख्या वाढताना दिसत आहे. धार्मिक कार्यक्रमांचा अभाव आणि वाढलेली आवक यामुळे शहाळ्यांच्या दरातही घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.






