गोपीनाथ मुंडे ज्यांचा सल्ला घ्यायचे, त्याच नेत्याचा आज भाजप प्रवेश, फडणवीसांकडून स्वागत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Anna Dange Join BJP: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होत आहे.
मुंबई : भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने वाडी वस्ती तांड्यावर पोहोचविण्याचे श्रेय ज्यांना जाते त्या पहिल्या फळीतील नेते अण्णा डांगे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा डांगे यांचे स्वागत केले. अण्णांच्या घरवापसीने मला खूप आनंद झाला, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. काही सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी २००२ मध्ये पक्ष सोडला होता.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होत आहे. भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेटून नेते काही नेते त्यांचा 'मुहूर्त' निश्चित करत आहेत. अण्णा डांगे यांच्या पक्षप्रवेशाला मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अण्णा डांगे आत्ता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होते.
advertisement
गोपीनाथराव अण्णांचा सल्ला घेऊन कॅबिनेटला जायचे-फडणवीस
फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि अण्णा डांगे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मुंडे आणि महाजनांच्या खांद्याला खांदा लावून अण्णा डांगे यांनी महाराष्ट्रात भाजपचे काम केले. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढण्यात अण्णांचा खूप मोठे योगदान आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चात असताना अण्णा मुख्य नेते होते. युती सरकारच्या काळात ज्यावेळी गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी मुंडे आधी अण्णांशी चर्चा करायचे आणि नंतरच कॅबिनेट बैठकीला जायचे. प्री कॅबिनेट बैठकच अण्णांजवळ होत असे, असे मी पाहिले आहे. गोपीनाथरावांना मार्गदर्शन करणारा नेता आज पुन्हा पक्षात येतो आहे, मला आनंद होतोय, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
advertisement
कोण आहेत अण्णा डांगे?
युती सरकारमध्ये नारायणराव राणे यांच्या मंत्रिमंडळात अण्णा डांगे यांनी ग्रामीण विकास आणि पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु २००२ साली पक्षातील तत्कालिन सहकाऱ्यांनी वाईट वागणूक दिल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकला. नंतर त्यांनी लोकराज्य नावाचा पक्ष स्थापन केला. पुढे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षात गेले. अनेक वर्षे त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात काम केले. धनगर समाजातील अतिशय मोठे नेते असा त्यांचा लौकिक आहे.
advertisement
कैलास गोरंट्याल यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार
जालन्याचे काँग्रेस नेते, कैलास गोरंट्याल यांनीही भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता, कैलासरावांसारखे जमिनीशी नाळ असलेले कार्यकर्ते पक्षात येत आहे, पक्षाला नक्कीच त्यांच्या प्रवेशाचा फायदा होईल, असे ते म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 5:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोपीनाथ मुंडे ज्यांचा सल्ला घ्यायचे, त्याच नेत्याचा आज भाजप प्रवेश, फडणवीसांकडून स्वागत