Fraud Case : मराठा तरुणांच्या योजनेत घोटाळा, टोळी अटकेत, मोठ्या रॅकेटचा सहभाग? समोर आली धक्कादायक माहिती
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Nashik News : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बिनव्याजी कर्ज योजनेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
नाशिक: राज्यातील महायुती सरकार विविध कारणांनी चर्चेत आले असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक उन्नतीसाठी मदत म्हणून राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बिनव्याजी कर्ज योजनेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
मराठा समाजाकडून आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सरकारकडून आरक्षणाबाबत ठोस पावले उचलण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आहे. मात्र, आता मराठा तरुणांसाठी असलेल्या योजनेतील घोटाळ्यामुळे मराठी समाजात नाराजी पसरण्याची शक्यता आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची असलेली योजना राज्यभर लोकप्रिय ठरत आहे. मात्र, त्यातच आता काही बिगर-मराठा लाभार्थ्यांनी देखील या योजनेतून फायदा घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासात अनुसूचित जमाती, ओबीसी आदी प्रवर्गातील व्यक्तींना कागदपत्रांमध्ये फेरफार करून या योजनेचा लाभ मिळवून देणारे एक रॅकेट कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित एजंटांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरू असून पुढील चौकशीदरम्यान आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
काय आहे योजना?
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी 10 लाखांपासून 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. कर्जावरील संपूर्ण व्याज सरकार भरते, तर लाभार्थ्यांना केवळ मूळ रक्कम बँकेला परत करावी लागते. ही योजना केवळ मराठा समाजासाठीच आरक्षित आहे.
गैरवापर कसा झाला?
काही एजंटांनी बनावट व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून “ही योजना सर्व समाजासाठी खुली आहे” असा खोटा संदेश पसरवला. या आमिषाला बळी पडून नॉन मराठा तरुणांनी एजंटांना पैसे देऊन योजना मिळवण्याचा प्रयत्न केला. एजंटांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून नॉन मराठा लाभार्थ्यांना मराठा असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून कर्ज मंजूर करून दिल्याची तक्रार आहे.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, राज्यभरात अशा प्रकारचे अनेक लाभार्थी आणि एजंट्स कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही कारवाई मराठा समाजासाठी आरक्षित असलेल्या योजनांवर कितपत काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 14, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Fraud Case : मराठा तरुणांच्या योजनेत घोटाळा, टोळी अटकेत, मोठ्या रॅकेटचा सहभाग? समोर आली धक्कादायक माहिती