Pune News: पुणे झालं ‘कुत्र्यांची नगरी’, दिवसाला 70 जण होतात शिकार, धक्कादायक आकडेवारी समोर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे शहरासह ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, त्याचा थेट फटका नागरिकांच्या सुरक्षेला बसू लागला आहे.
पुणे: पुणे शहरासह ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, त्याचा थेट फटका नागरिकांच्या सुरक्षेला बसू लागला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल 1 लाख 7 हजार 520 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही गंभीर आकडेवारी समोर आली आहे.
पालिकेच्या कारभारावर आणि भटक्या प्राण्यांच्या नियंत्रणावरील उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरटीआय अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय आणि पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या काही वर्षांत कुत्रा चावल्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे.
ससूनमधील रुग्णांची आकडेवारी
- 2022- 4,852 रुग्ण
- 2023- 9,377 रुग्ण
- 2024- 11,625 रुग्ण
- 2025 (एप्रिलपर्यंत)- 3,941 रुग्ण
- एकूण : 29,795 रुग्ण
advertisement
पीएमसी रुग्णालयातील उपचारित रुग्ण
- 2022 : 16,569
- 2023 : 22,945
- 2024 : 25,899
- 2025 (मेपर्यंत) : 12,312
- एकूण : 77,725 रुग्ण
या दोन्ही मिळून तब्बल 1,07,520 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा धक्कादायक डेटा समोर आला आहे. ही परिस्थिती जनजीवनासाठी किती धोकादायक बनत चालली आहे, याची जाणीव या आकडेवारीतून स्पष्ट दिसते. आरटीआयला दिलेल्या उत्तरात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करणाऱ्या खाजगी संस्थांबद्दलची माहिती पीएमसीकडे नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
advertisement
याचा अर्थ, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण, लसीकरण आणि त्यांचे सर्वेक्षण या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोण आणि कशा प्रकारे पार पाडत आहे याचा स्पष्ट तपशीलच पालिकेकडे उपलब्ध नाही. नियमांनुसार, महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण, लसीकरण, पुनर्वसन आणि संबंधित नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र आकडेवारीने दाखवून दिले आहे की गेल्या काही वर्षांत या कामात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच शहरातील प्रत्येक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढताना दिसत आहे.
advertisement
रात्रीच्या वेळी रस्त्यावर हिंडणाऱ्या टोळ्या, शाळेत जाणाऱ्या मुलांवर हल्ले, वृद्धांवर किंवा एकट्या प्रवासी महिलांवर धावणे आणि सायकल- दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आकडेवारी समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चार वर्षांत 1 लाख लोकांना कुत्रे चावले आहेत आणि पालिकेला लसीकरण करणाऱ्या संस्थांचीच माहिती नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
advertisement
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण, निर्बीजिकरणाची गती वाढवणे, योग्य नोंदी ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी होत आहे. पुणे शहराचा जलदगतीने विस्तरीकरण होत असतानाच भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने तातडीने प्रभावी आणि पारदर्शक धोरण आखले नाही तर ही परिस्थिती भविष्यात आणखी बिकट होऊ शकते. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे अशी मागणी केली जाते आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News: पुणे झालं ‘कुत्र्यांची नगरी’, दिवसाला 70 जण होतात शिकार, धक्कादायक आकडेवारी समोर









