कोल्हापुरात मध्यरात्री दंगलसदृश्य राडा, जमावाकडून दगडांसह-पेट्रोल बॉम्बचा मारा, पोलिसांसह 10 जखमी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Kolhapur: शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील सिद्धार्थनगर राजेबागस्वार परिसरात दंगलसदृश्य राडा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कोल्हापूर : शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील सिद्धार्थनगर राजेबागस्वार परिसरात दंगलसदृश्य राडा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून झालेल्या वादानंतर या भागात मोठा राडा झाला. रात्री उशिरा एका जमावाने सिद्धार्थनगर राजेबागस्वार भागात घुसून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. यावेळी दोन पेट्रोल बॉम्ब टाकल्याची देखील माहिती आहे.
हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाले. अनेक लोक घरातून बाहेर पडले. त्यांनी जमावाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाने पोलिसांवर देखील प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस आणि स्थानिक नागरिक असे एकूण १० जण जखमी झाल्याची माहिती आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापनदिन होता. या मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून शुक्रवारी दुपारी वाद झाला. शुक्रवारी रात्री याच वादातून दोन समाज आमने सामने आले. सिद्धार्थनगर - राजेबागस्वार परिसरात दगडफेक, तोडफोड करत वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता.
advertisement
वादाला तोंड कसं फुटलं?
सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ साऊंड लावल्याने संपूर्ण रस्ता व्यापला होता. यामुळे सिद्धार्थ नगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली. रात्री पावणेदहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात एक तरुणांचा जमाव शिरला. या जमावाने दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली. मालवाहतूक रिक्षा, टेम्पो जमावाने उलटून टाकले. त्यात पेट्रोल ओतून ते पेटवून देण्यात आले. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. प्रारंभी कोणालाच काय झाले ते समजत नव्हते. मात्र, समोरच्या बाजूने हल्ला होत असल्याचे समजातच सिद्धार्थनगर परिसरातील महिला, तरुण सर्वच घराबाहेर पडले, त्यांनी जमावावर चाल केली. यावेळी जमाव पसार झाला. रात्री उशिरापर्यंत या भागात तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 23, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात मध्यरात्री दंगलसदृश्य राडा, जमावाकडून दगडांसह-पेट्रोल बॉम्बचा मारा, पोलिसांसह 10 जखमी