तटकरेंना ब्लॅकमेलर म्हणणारे थोरवे आदितींसोबत एका कार्यक्रमात, पण निवडणुकीत महायुतीतच कुस्ती!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Raigad NCP vs Shiv Sena: शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री आदिती तटकरे एकाच व्यासपीठावर आलेले पहायला मिळाले.
मोहन जाधव, प्रतिनिधी, अलिबाग, रायगड : रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा रायगडमधील अलिबाग शहरातील आर सी एफ सभागृहात सोमवारी पार पडला. या सोहळ्याप्रसंगी एकमेकांविरोधात सध्या हल्लाबोल करणारे शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर आलेले पहायला मिळाले.
पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. महायुतीत असले तरीही तटकरे यांच्याविरोधात गोगावले आणि थोरवे यांनी संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. थोरवे आणि गोगावले यांचे तटकरे यांच्यासोबतचे वैर संपूर्ण राज्याला परिचित आहेत. हेच वैर पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.
advertisement
रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर आलेले पहायला मिळाले. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांना ब्लॅकमेलर म्हणणारे अलिबागचे आमदार महेंद्र थोरवे सुद्धा आज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परस्पर विरोधी लढण्याची भूमिका बजावणारे हे नेते आज एकच व्यासपीठावर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढण्यावर शिवसेना शिंदे गट ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
advertisement
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या युती-आघाड्यांसंदर्भातील अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आल्याचे सर्वपक्षीय वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतच कुस्ती होण्याची ९९ टक्के शक्यता व्यक्त होत आहे. तटकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन जिल्हा परिषद-पंचायत समितीत शिवसेना शिंदे गट जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखतो आहे.
advertisement
कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे जिल्हा परिषद सीइओ यांच्या दालनाबाहेर आंदोलन
शिक्षकांच्या बदल्या कराव्यात यासाठी दालनाबाहेर झोपून कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे जिल्हा परिषद सीइओ यांच्या दालनाबाहेर आंदोलन झाले. श्रीवर्धन तालुक्यातून कर्जत तालुक्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचे लाड म्हणाले. मंत्री आदिती तटकरे यांच्या तोंडी आदेशाने बदल्या थांबल्याचा सुरेश लाड यांनी आक्षेप घेतला. जोपर्यंत शिक्षक बदल्यांची ऑर्डर होत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका सुरेश लाड यांनी घेतली.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
October 13, 2025 5:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तटकरेंना ब्लॅकमेलर म्हणणारे थोरवे आदितींसोबत एका कार्यक्रमात, पण निवडणुकीत महायुतीतच कुस्ती!