Ganeshotsav 2025: 'मायभूमीशी असलेली नाळ तुटलेली नाही', पुणेकर दाम्पत्याने केली आयर्लंडमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Ganeshotsav 2025: आयर्लंडमध्ये वास्तव्यास असलेलं नेमाडे दाम्पत्य अतिशय उत्साहाने भारतीय सण-उत्सव साजरे करतात.
पुणे : नोकरीनिमित्त असंख्य भारतीय परदेशात राहतात. आपल्या मायभूमीपासून लांब राहत असले तरी भारतीय तिथेही आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. आपले पारंपरिक सण-उत्सव हे जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहेत. परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये पुणेकरांचा समावेश लक्षणीय आहे. सध्या आयर्लंडमध्ये वास्तव्यास असलेलं नेमाडे दाम्पत्य देखील अतिशय उत्साहाने भारतीय सण-उत्सव साजरे करतात.
मुळचे पुण्याचे असलेले सुशील नेमाडे आणि प्रियंका नेमाडे या दाम्पत्याने आयर्लंडमधील डब्लिन शहरात गणरायाची स्थापना केली आहे. सुशील आणि प्रियंका सध्या डब्लिन शहरात वास्तव्याला आहेत. सुशील नेमाडे हे 'मास्टर कार्ड' या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करतात. नेमाडे दाम्पत्य दरवर्षी डब्लिन येथील घरी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतात. त्यांना पुण्यात लहानपणापासून गणेशोत्सवाचे संस्कार लाभले आहेत. आयर्लंडमध्येही तितक्याच श्रद्धेने आणि प्रेमाने हे संस्कार जपले आहेत. डब्लिनमध्ये ते संपूर्ण 10 दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.
advertisement
या वर्षी पदेशातील घरी प्राणप्रतिष्ठ करण्यासाठी त्यांनी पुण्याहून आकर्षक गणपती बाप्पाची मूर्ती मागवली आहे. बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर दररोज पूजा, आरती, नैवेद्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची त्यांच्या घरी रेलचेल असते. नेमाडे दाम्पत्याच्या गणेशोत्सवात भारतातील मित्र-मैत्रिणी आणि स्थानिक नागरिक देखील सहभागी होतात.
advertisement
सुशील नेमाडे म्हणाले, "परदेशात असलो तरी पुण्याशी असलेली नाळ तुटलेली नाही. आम्ही जेव्हा पुण्याहून दूर आलो तेव्हाच ठरवलं की, आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रसार करायचा. गणेशोत्सव हा आमच्यासाठी केवळ सण नाही तर ओळख आहे."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 01, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganeshotsav 2025: 'मायभूमीशी असलेली नाळ तुटलेली नाही', पुणेकर दाम्पत्याने केली आयर्लंडमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा