कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण, पुणे कोर्टात साळसूदपणाचा आव, युक्तिवादावेळी काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Krishna Andekar: आरोपीचे वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कृष्णा आंदेकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणात मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा आंदेकर यानेच हत्येचा कट रचला असून आरोपी यश पाटील आणि अमन पठाणला त्याने पिस्तूल पुरविले, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. आरोपींना दिलेले हत्यार कुठून आणले आणि कृष्णाने कोणत्या ठिकाणी आरोपींकडे हत्यार सोपवले याची चौकशी करायची असल्याचा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला. आरोपीचे वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कृष्णा आंदेकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कृष्णाला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने आयुषच्या खून प्रकरणात कृष्णाचा नेमका सहभाग काय होता, याची चौकशी पुणे पोलीस करतील.
आरोपी कृष्णा आंदेकर आज (मंगळवारी) सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला. मंगळवारी दुपारी चार वाजता त्याला विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष मकोका न्यायालयाने कृष्णा आंदेकर याला १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या खून प्रकरणातील सर्व १३ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कृष्णानेच आयुषच्या हत्येसाठी पिस्तूल यश आणि अमनला दिले-पोलीस
advertisement
आरोपीकडे असलेले हत्यार आम्हाला जप्त करायचे आहे. तसेच कृष्णासहित इतर आरोपींनी हत्येचा प्लॅन कुठे रचला? ते आम्हाला शोधायचे आहे. कृष्णानेच अमन पठाण याला हत्यार पुरवले होते, ते हत्यार कुठून आणले आणि इतर आरोपींना ते हत्यार कुठल्या जागी सोपविले, याची सखोल चौकशी आरोपींना एकमेकांसमोर बसवून करायची आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
advertisement
कृष्णाचा न्यायालयात साळसूदपणाचा आव
त्यावर माझा सगळा तपास झाला आहे. आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालो आहोत. सकाळी १० वाजताच आम्ही हजर झालो आहोत. मला कोठडीची आवश्यकता नाही. बाकी सगळे आरोपी कोठडीत आहेत. माझे नाव या प्रकरणात आले असे कळल्याने मी स्वतः हजर झालो, असा साळसूदपणाचा आव कृष्णाने न्यायालयात आणला. माझा या खून प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, असा अप्रत्यक्ष दावा करून पोलिसांनी या प्रकरणाचा सगळा तपास केला आहे, असे कृष्णा वकिलाकरवी म्हणाला.
advertisement
एकूण १३ आरोपी, कृष्णा आंदेकर हा मुख्य आरोपी, एकत्र बसवून चौकशी करायची आहे-पोलीस
त्यावर तपास अधिकाऱ्यांनी आमचा तपास पूर्ण झालेला नसल्याचे सांगितले. आमचा तपास अजूनही सुरू आहे. तपासात रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. आम्हाला तपासासाठी अजून वेळ हवा आहे. एकूण १३ आरोपी आहेत. कृष्णा आंदेकर हा मुख्य आरोपी आहे. याने हत्यार पुरवले होते. इतर आरोपींशी हा सातत्याने संपर्कात होता. इतर आरोपी आणि कृष्णा काही दिवस एकत्र फरार होते. तसेच या अनुषंगाने आर्थिक तपासही करायचा आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 16, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण, पुणे कोर्टात साळसूदपणाचा आव, युक्तिवादावेळी काय घडलं?