अजितदादांचा काँग्रेसला धक्का, बड्या नेत्याच्या मनगटावर घड्याळ, कोकणात ताकद वाढली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: प्रवीण ठाकूर यांच्या पक्षप्रवेशामुळे अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अॅड. प्रवीण ठाकूर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहेत.
काँग्रेस पक्षात आमच्यावर अन्याय झाला. काँग्रेसमध्ये राहून जनतेचे प्रश्न सुटत नाही. शेवटी राजकारण राहून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात, तेच प्रश्न सुटले नाहीत. तर आमचा राजकारणात फायदा काय? असे सांगून जनतेच्या प्रश्नासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतोय, असे प्रवीण ठाकूर यांनी सांगितले.
प्रवीण ठाकूर यांच्या पक्षप्रवेशामुळे अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली-अजित पवार
advertisement
प्रवीण ठाकूर यांच्या पक्षप्रवेशामुळे अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक बळ मिळणार आहे. नव्यानं प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सामाजिक सलोखा वाढावा आणि अधिकाधिक लोकहिताची कामं आपल्या हातून घडो, असेही अजित पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगड-अलिबाग जिल्ह्याला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्या पुरोगामी विचारधारेचा वारसा जपत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा आमचा निर्धार असल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी-महायुती सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात पर्यटन, शेती, मासेमारी, उद्योग, पायाभूत सुविधा, महिला आणि बालकल्याण क्षेत्रात मोठ्या गतीनं विकासात्मक कामं सुरु आहेत. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सौंदर्याला अबाधित ठेवण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटी, रोजगारनिर्मिती या बाबींवरही विशेष लक्ष दिलं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
काँग्रेसला धक्क्यावर धक्के
दोन दिवसांपूर्वीच जालन्याचे काँग्रेसचे नेते, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला
धडा शिकवल्याने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला, असे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यांच्या पक्षप्रवेशाला तीन दिवस उलटत नाही तोच प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
August 02, 2025 9:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा काँग्रेसला धक्का, बड्या नेत्याच्या मनगटावर घड्याळ, कोकणात ताकद वाढली