Wari 2024: परंपरेनुसार श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना त्या खास नदीत शाही स्नान!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
ज्ञानेश्वर महाराजांचा वारी सोहळा पुणे ग्रामीणच्या हद्दीत येताच सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना मध्ये नीरा नदीचा प्रवाह आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : अत्यंत प्रसन्न वातावरणात सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे. या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. श्री संत महाराजांच्या पालख्यांसंगे त्यांनी पायी पंढरपूरची वाट धरली आहे. काही दिवसांपूर्वी देहूतून श्री संत तुकाराम महाराजांची आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली. परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान घालण्यात आलं.
advertisement
दरवर्षी विठ्ठल भेटीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी वारी सोहळ्यात सहभागी होतात. आनंद आणि भक्तीचा हा असा सोहळा जगाच्या पाठीवर कुठंही पाहायला मिळत नाही. पंढरीच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा हा मेळा महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हेनगरीचा निरोप घेऊन साताऱ्यात दाखल झाला.
काय आहे नीरा नदीत पादुकांना स्नान घालण्यामागचं कारण?
ज्ञानेश्वर महाराजांचा वारी सोहळा पुणे ग्रामीणच्या हद्दीत येताच सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना मध्ये नीरा नदीचा प्रवाह आहे. हा प्रवाह एका ओघात, एका सरीत आहे. धार्मिकदृष्ट्या हा केवळ जलप्रवाह नाही, तर जीवनप्रवाह मानला जातो. संत ज्ञानोबाराय महाराज जी नदी ओलांडून जात आहेत, तिच्या काठावर त्यांच्या पादुकांना स्नान घातलं जातं. शिवाय वारकरीही नदीपात्रात स्नान करतात.
advertisement
यामुळे वारकरी बांधवांचा आनंद द्विगुणित होतो. जेव्हा श्री संतांच्या पादुकांचा स्पर्श होतो, तेव्हा हजारो लोकांचे पाप धुवणारी ही नदी पुनर्जीवित होते, परम पवित्र होते, असं मानलं जातं. त्यामुळे नीरा नदीचं स्नान हे वारी सोहळ्यातलं आकर्षण असतं. स्नानानंतर अनेक भाविक नदीच्या पाण्याला, साधं पाणी न समजता तीर्थ मानतात आणि या पाण्यात स्वतः स्नान करून आपण पावन झालो, असं मानून पुन्हा पालखीसोबत पंढरपूरला मार्गस्थ होतात, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ विश्वस्त यांनी दिली.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
July 07, 2024 9:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Wari 2024: परंपरेनुसार श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना त्या खास नदीत शाही स्नान!

