Sharad Pawar : राज्यात पुन्हा भूकंप होणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत.
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आता दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे यांना मान्य असायला हवं, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हात वर केले होते. मी सामान्य कार्यकर्ता आहे. साहेब आणि अजितदादा निर्णय घेतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. तर त्यानंतर रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निर्णय सोपवला होता. अशातच आता शरद पवारांनी युवा नेत्यांवर निर्णय सोडला आहे.
advertisement
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार हे सकाळपासून पुण्यातील मोदीबाग इथे आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी महत्त्वाचे राजकीय भाष्य केले. त्यांचं वक्तव्य हे पुन्हा राजकीय भूकंप करणार का अशी चर्चा सुरू झालीय.
शरद पवार यांनी म्हटले की, सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
advertisement
काही आमदारांचा कल अजित पवारांकडे...
काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबतचा निर्णय हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा असंही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी खासदारांसोबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
अजितदादा गटाकडून सावध प्रतिक्रिया...
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितले की, आमच्या पक्षात या विषयावर अद्याप चर्चा झाली नाही. अजितदादांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर 43 आमदार सोबत आले. आमचे दोन्ही पक्ष वेगळे आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यात काय बोलणं झालंय याची माहिती नाही. मात्र, आमच्या पक्षात आम्ही एकत्रितपणे चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 08, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : राज्यात पुन्हा भूकंप होणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत