जेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर मनोहर जोशी स्वत: चप्पल घेऊन आले...पुण्यातल्या शिवसैनिकाने सांगितला 'तो' किस्सा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जायचे. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची कारकीर्द होती.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं आज (23 फेब्रुवारी) निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जायचे. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची कारकीर्द होती. मनोहर जोशी यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. पुण्यातील काही शिवसैनिकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
हा किस्सा आहे पुण्याचे जेष्ठ शिवसैनिक दत्तू डोंगरे यांचा. त्यांचे सुपूत्र प्रवीण दत्तू डोंगरे यांनी या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, 'माझे वडील दत्तू डोंगरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असा पण घेतला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्व शिवसैनिकांची इच्छा होती. परंतु आपण कधीच सत्तेचं कोणतंही पद घेणार नाही, अशी शप्पथच बाळासाहेबांनी घेतली होती. त्यामुळे ते जर मुख्यमंत्री नाही, तर महाराष्ट्राचा शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यावेळी मनोहर जोशी यांचं नाव अचानकपणे जाहीर करण्यात आलं.'
advertisement
'पुढे मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यावर मनोहर जोशी यांना शिवसेनेच्या दत्तू डोंगरे या कट्टर शिवसैनिकाने घेतलेला पण कळला. तेव्हा ते स्वत: चप्पल घेऊन पुण्यात आले आणि दत्तू डोंगरे यांना म्हणाले की, 'दत्तोबा आता तरी चप्पल घाला, मी मुख्यमंत्री झालोय.' त्यानंतर दत्तू डोंगरे यांनी आपला पण सोडला.' हा क्षण खरोखर भावूक करणारा आहे.
advertisement
प्रवीण डोंगरे यांनी सांगितलं की, 'मी जेव्हा वडिलांसोबत दादरला मनोहर जोशी यांच्या ऑफिसला जायचो तेव्हा वडील चिट्ठीवर 'दत्तू डोंगरे, पुणे' असं लिहून द्यायचे. त्यावेळी तिथे कितीही गर्दी असली तरी ते आम्हाला बोलवून आमची विचारपूस करत असत. एकंदरीत अतिशय सुसंस्कृत, मनमिळाऊ आणि पक्षाशी एकनिष्ठ असं मनोहर जोशी यांचं व्यक्तिमत्त्व होतं. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक शिवसैनिकाची ते नेहमी विचारपूस करत असत. अलिकडच्या काळात शिवसेनेत घडलेल्या घडामोडींनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते. अखेर त्यांच्या निधनाने शिवसेनेने एक कट्टर शिवसैनिक मात्र गमावला!'
advertisement
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने मनोहर जोशी यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती आणि शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 23, 2024 6:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
जेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर मनोहर जोशी स्वत: चप्पल घेऊन आले...पुण्यातल्या शिवसैनिकाने सांगितला 'तो' किस्सा