शेतात खेळत होता अन् क्षणात गायब; 8 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्यानं घेतला जीव, जुन्नरमधील दुर्दैवी घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शेताजवळ खेळत असलेल्या एका निष्पाप ८ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
(सचिन तोडकर, प्रतिनिधी) जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. आता आणखी एक घटना समोर आली आहे. पारगाव तर्फे आळे परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. यात शेताजवळ खेळत असलेल्या एका निष्पाप ८ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
बाबू नारायण कापरे (वय ८) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. बाबू हा एका शेतमजूर कुटुंबातील मुलगा होता. ही घटना घडली तेव्हा बाबू शेतालगतच्या परिसरात खेळत होता. जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधून त्याच्यावर हल्ला केला. ज्यामुळे मुलाला प्रतिकार करण्याची किंवा मदतीसाठी ओरडण्याचीही संधी मिळाली नाही.
advertisement
या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आहे. वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. "अजून किती निष्पाप बळी जाणार?" असा संतप्त सवाल विचारत गावकऱ्यांनी वन विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि जुन्नर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. स्थानिकांनी विशेषतः लहान मुलांना एकटे बाहेर न सोडण्याचे तसेच शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शेतात खेळत होता अन् क्षणात गायब; 8 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्यानं घेतला जीव, जुन्नरमधील दुर्दैवी घटना










