New Year Kitchen tips: पिठालाही असते एक्सपायरी डेट? अधिक काळ पीठ वापरणं धोक्याचं; नवीन वर्षात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
New Year Kitchen tips: पीठ कोणतंही असो विकत आणलेलं पीठ असेल तर ते कधी दळलंय? कधी पॅक केलंय याची कल्पना नसते. त्यामुळे अधिक काळ जुनं पीठ वापरणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाजारातून विकतं आणलेलं पीठ किती काळापर्यंत वापरायचं याला काही मर्यादा आहेत.
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टी फास्ट आणि इन्स्टंट झाल्या आहेत. पूर्वी आपल्याकडे कोणतंही पीठ बाजारातून विकत आणलं जात नव्हतं. घरी धान्य आणून ते साफ करून मग ते दळायला दिलं जायचं. मात्र आता नोकरदार महिलांना नोकरी आणि संसार सांभाळाताना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी अनेकांना बाहेरून पीठ विकत आणावं लागतं. मग ते पीठ भाकरीचं असो की चपातीचं. मात्र विकत आणलेलं पीठ कधी दळलेलं आहे? कधी पॅक केलंय याची तुम्हाला कल्पना नसते. त्यामुळे अधिक काळ जुनं पीठ वापरणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाजारातून विकतं आणलेलं पीठ किती काळापर्यंत वापरायचं याला काही मर्यादा आहेत.
जाणून घेऊयात पीठ वापरण्याबद्दल आहारतज्ज्ञ काय सल्ला देत आहेत तो.
पीठाला असते एक्सपायरी डेट?
गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं पीठ फारच जास्त काळ साठवून ठेवणं किंवा फार काळ साठवलेलं जुनं धोक्याचं आहे. कारण जास्त काळ साठवून ठेवलेलं पीठ खराब होण्याची शक्यता असते. पीठ साठवण्यासाठी योग्य काळजी घेतली गेली तर ते 6 महिन्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतं. मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त जुनं पीठ वापरू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. पॅकबंद केलेल्या विविध पिठांवर प्रक्रिया केली असल्यामुळे ते पीठ वापरण्याची मर्यादा किंवा त्या पिठाची एक्सपायरी डेट त्या पॅकवर छापलेली असते. त्यामुळे त्या विहित कालावधीत पिठाचा वापर करून ते संपवणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
advertisement

खराब पीठ कसं ओळखायचं ?
जर पिठाला वेगळा, विचित्र, कुबटसा वास येत असेल तर समजून जा की, ते पीठ खराब झालं आहे. याशिवाय खराब पिठाचा रंग बदलतो. ते पिवळं किंवा तपकिरी रंगाचं दिसू लागतं. खराब झालेलं पीठाची चव बदलून ते चवीला कडू किंला विचित्र चवीचं होऊ शकतं. पिठात छोटे किडे, धुळीसारखे कण, अळ्या किंवा पोपेटी दिसू लागल्या तर ते पीठ खराब झालेलं आहे असं समजावं. असं पीठ खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे असं पीठ लगेच फेकून द्या. जर पीठ फेकणं तुमच्या जीवावर येत असेल तर त्या पिठाचा वापर तुम्ही झाडांना खत म्हणून करू शकता. तेलकट भांडी घासण्यासाठी या पिठाचा वापर करता येऊ शकतो. मात्र एक लक्षात ठेवा की, जर भांडी घासण्यासाठी खराब झालेलं पीठ वापरत असाल तर भांडी धुतल्यानंतर ती व्यवस्थित स्वच्छ होतील याची काळजी घ्या. शिवाय तुमचे हातही भांडी धुतल्यानंतर साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे त्या खराब झालेल्या पिठातून तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता मावळेल.
advertisement
पीठ सुरक्षित कसं ठेवायचं ?
- कोणतंही पीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. डब्यातून पीठ काढल्यानंतर झाकण घट्ट बंद करा जेणेकरून आर्द्रता आणि हवेपासून पीठ सुरक्षित राहू शकेल.
- तुम्ही दुकानतून थेट पीठ विकत घेतलेलं असेल तर कॅलेंडर किंवा किराणा सामानाच्या वहीवर पीठ खरेदी केल्याच्या तारखेची नोंद करून ठेवा. जेणेकरून ते पीठ योग्य वेळेत संपवणं तुम्हाला शक्य होईल.
- तुम्ही ज्या डब्यात पीठ ठेवणार आहात तो डबा, थंड आणि कोरड्या जागी ठेवा. सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवल्याने डब्याच्या आतलं पीठ सुरक्षित राहायला मदत होईल.
- कोणतंही पीठ 6 महिन्यांपेक्षा जास्त वापरू नये. मात्र काही कारणांमुळे तुमच्या असं पीठ वापरण्याची वेळ आली तर ते पीठ फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये ठेवा.
- एकाच वेळी जास्त प्रमाणात पीठ साठवून ठेवण्यापेक्षा आवश्यकतेनुसार दर महिन्याला पीठ विकत आणलं तर ते तुमच्या आरोग्याच्या फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
New Year Kitchen tips: पिठालाही असते एक्सपायरी डेट? अधिक काळ पीठ वापरणं धोक्याचं; नवीन वर्षात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी