जास्त मटण, चिकन खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? हिवाळ्यात काय टाळलं पाहिजे?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
बदलती जीवनशैली, चुकीच्या आहार पद्धती आणि ताणतणावपूर्ण दिनचर्येमुळे मूळव्याध, भगंदर आणि बद्धकोष्ठता हे आजार सर्वसाधारण होत चालले आहेत.
पुणे: गेल्या काही वर्षांपासून शहरांतील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मूळव्याध, फिशर, भगंदर आणि बद्धकोष्ठता ही नावं जरी जुनी वाटतं असली तरी या समस्या वाढताना पाहिला मिळत आहेत. बदलती जीवनशैली, चुकीच्या आहार पद्धती आणि ताणतणावपूर्ण दिनचर्येमुळे हे आजार सर्वसाधारण होत चालले आहेत. फॅमिली फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, योग्य काळजी घेतली तर हे आजार सहजपणे टाळता येऊ शकतात, मात्र दुर्लक्ष केल्यास गंभीर त्रास उद्भवू शकतो.
मूळव्याध हा एकच आजार नसून तीन प्रमुख प्रकारांमध्ये तो विभागला जातो. सर्वाधिक आढळणारा प्रकार म्हणजे एनल फिशर गुद्द्वारातील त्वचेवर झालेली जखम. यात शौच करताना तीव्र वेदना होतात आणि रक्तस्रावही होऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे पाइल्स, ज्यात गुद्द्वाराच्या आतील भागातील रक्तवाहिन्या सूजून बाहेर येतात. यात वेदना नसल्या तरी रक्तस्राव होणे ही मुख्य लक्षणे आहेत. तिसरा प्रकार म्हणजे भगंदर यात गुद्द्वाराजवळ फोड निर्माण होतो, सुज येते आणि तीव्र वेदना जाणवतात. काही रुग्णांमध्ये हा फोड सतत पुळीसारखा वाहत राहतो.
advertisement
गंभीर बाब म्हणजे गुद्द्वाराच्या कर्करोगाची लक्षणे मूळव्याधीसारखीच असल्याने अनेक नागरिक स्वतःहून उपचार करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे निदानात उशीर होतो. अशावेळी तज्ञ डॉक्टरांची तपासणी अत्यावश्यक ठरते. डॉ. भोंडवे सांगतात की, "या वाढत्या आजारांचे मुख्य कारण म्हणजे कडक शौच होणे आणि शौचासाठी अत्याधिक जोर लावणे. हा त्रास आहारातील तंतुमय पदार्थांची कमतरता, डाळींचे जास्त सेवन, पालेभाज्यांचा अभाव आणि पुरेसे पाणी न पिणे यांमुळे वाढतो. अनेक जण तहान लागल्यावरच पाणी पितात, त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी राहते, परिणामी शौच कडक होते."
advertisement
याशिवाय जंक फूड, तळलेले पदार्थ, फास्टफूड, अतिप्रमाणात मांसाहार, व्यसनाधीनता आणि मद्यपान यामुळेही बद्धकोष्ठता वाढते आणि मूळव्याधीसारखे आजार निर्माण होण्यासाठी स्थिती तयार होते. जास्त वेळ बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीही या आजारांची मोठी कारणे मानली जातात. या समस्यांवर उपायही सोपे आहेत. सर्वप्रथम, दररोज पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे. दिवसाला किमान 8–10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आहारात भरपूर तंतुमय पदार्थ, पालेभाज्या, फळे, डाळी, संपूर्ण धान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
advertisement
जंक फूड टाळणे, मद्य आणि तंबाखूचे सेवन कमी करणे, नियमित व्यायाम करणे आणि शौचाची भावना नसेल तर जबरदस्ती न करणे ही काळजी घेतल्यास मूळव्याधीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. डॉ. भोंडवे यांचे मत आहे की कोणत्याही गुदरोगाची लक्षणे दिसल्यावर स्वतःहून औषधे घेणे टाळावे. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घेतला आणि जीवनशैलीत आवश्यक बदल केले तर पाइल्स, फिशर, भगंदर यांसारखे त्रास पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि भविष्यातले धोकेही टाळले जाऊ शकतात.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:31 PM IST









