Eknath Shinde : भाजप नेत्यानं शिवसेनेचा बाप काढला! महायुतीत नाराजीची ठिणगी, शिंदेंकडे मंत्री-आमदारांचा संताप...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Eknath Shinde : भाजप आमदार परिणय फुके यांनी "शिवसेनेचा बाप मीच" असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीच्या मिठाचा खडा पडला आहे.
मुंबई: भाजप आमदार परिणय फुके यांनी "शिवसेनेचा बाप मीच" असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीच्या मिठाचा खडा पडला आहे. फुके यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटातील अनेक मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. युतीतील ‘मित्र पक्षा’बाबत अशा प्रकारची भाषा वापरणे हे गंभीर असून, यामुळे युतीतील विश्वासाचे नाते डळमळीत होत असल्याची तीव्र भावना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली आहे.
शिंदे गटात नाराजी...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी, आमदारांनी पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल विशेष भेट घेत ही नाराजी थेट मांडली. यापूर्वीही भाजपकडून शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांना परस्पर पक्षात प्रवेश दिला गेला आहे, तसेच निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवार उभे केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे युतीतील समन्वय आधीच ताणत असताना, परिणय फुके यांसारखी वक्तव्ये आणखी दुरावा निर्माण करत असल्याचा सूर या बैठकीत होता.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर समन्वय समितीच्या बैठकीत संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेऊन, युतीतील तणाव कमी करण्याचे आणि तीनही पक्षांमध्ये (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) अधिक समन्वय ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून युतीत अंतर्गत कुरबुरी वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टाळून, समंजसपणे निर्णय घेण्याचा सल्ला भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सातत्याने दिला जात आहे. मात्र, तरीही वारंवार अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य होणे हे युतीतील टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
advertisement
परिणय फुके यांनी मागितली माफी...
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिंदेसेनेबाबत काही दिवसांपुर्वी वादग्रस्त विधान केले होते. पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना 'शिवसेनेचा बाप मीच आहे' असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली. आमदार परिणय फुके यांनी माफी मागण्याची आक्रमक मागणी शिंदे गटाकडून घेण्यात आली होती. या वक्तव्यवर माफी न मागितल्यास शिवसेना स्टाइलने प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा शिंदे गटाच्या नेत्यांनी दिला होता. महायुतीमधील वाद चिघळू नये यासाठी परिणय फुके यांनी अखेर वादावर पडदा टाकत माफी मागितली.
advertisement
भंडाऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात बोलताना फुके यांनी स्थानिक राजकारणावरून बोलताना शिवसेना शिंदे गटावर बोचरी टीका केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 8:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : भाजप नेत्यानं शिवसेनेचा बाप काढला! महायुतीत नाराजीची ठिणगी, शिंदेंकडे मंत्री-आमदारांचा संताप...