Diwali 2025 : दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुखद बातमी, पुणे ते नागपूर धावणार जनशिवनेरी, असे करा तिकीट बुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्याहून नागपूरकडे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवाळीच्या काळात अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
पुणे: दिवाळीचा सण जवळ येत असताना गावी जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरू झाली आहे. विशेषत: विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ या भागात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी आहे. पुण्याहून नागपूरकडे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवाळीच्या काळात अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार पुणे ते नागपूर या मार्गावर जनशिवनेरी बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
ही बस शनिवार, 18 ऑक्टोबरपासून पुणे वाकडेवाडी येथून सुटणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सकाळी सहा वाजता या बसचा पहिला फेरा निघणार आहे. जनशिवनेरी ही एअर-कंडिशन्ड, आधुनिक आणि लांब प्रवासासाठी उपयुक्त अशी आलिशान बससेवा आहे. पुणे ते नागपूर हा जवळपास 750 किलोमीटरचा प्रवास असून ही बस अंदाजे 12 ते 13 तासांत नागपूरला पोहोचणार आहे.
advertisement
एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये जीपीएस, मोबाइल चार्जिंग पॉईंट, वाय-फाय सुविधा, सीट बेल्टसह आरामदायी रीक्लायनिंग सीट्स देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्ये दोन ठिकाणी थांबे ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाइन आरक्षणाची सुविधाही सुरू करण्यात आली असून एसटीच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवरून प्रवासी आगाऊ तिकीट बुक करू शकतात.
advertisement
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे आणि खासगी बसच्या तिकिटांना मोठी मागणी आहे. काही ठिकाणी तिकीटदरात वाढ झाल्याने प्रवासी वर्ग नाराज होता. अशावेळी एसटी महामंडळाची ही जनशिवनेरी सेवा प्रवाशांसाठी दिलासा ठरणार आहे.
या उपक्रमामुळे पुणेकरांना नागपूरकडे जाण्यासाठी सुरक्षित, आरामदायी आणि परवडणारा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात जनशिवनेरी बस प्रवाशांसाठी एक आनंददायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Diwali 2025 : दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुखद बातमी, पुणे ते नागपूर धावणार जनशिवनेरी, असे करा तिकीट बुक