Ashadhi Wari 2024: आषाढी यात्रेसाठी 11 लाख बुंदीचे लाडू बनवण्याच्या कामाला वेग; भाविकांकडून मोठी मागणी
- Published by:Ramesh Patil
- Written by:Virendrasigh Utpat
Last Updated:
Ashadhi Wari 2024: गेल्या काही वर्षांपासून विठुरायाचा प्रसाद म्हणून भाविक बुंदीचा लाडू यात्रेतून आपल्या गावाकडे घेऊन जातात. विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी आहे.
पुणे : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू देण्यात येतो. अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून यावर्षी मंदिर समितीने 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे. यंदाची आषाढी यात्रा विक्रमी भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनविण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून विठुरायाचा प्रसाद म्हणून भाविक बुंदीचा लाडू यात्रेतून आपल्या गावाकडे घेऊन जातात. विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी आहे. लाडक्या विठुरायाचा सर्वोच्च उत्सव असलेल्या या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून येथे रूढ झाली आहे.
advertisement
सध्या रोज 25 हजार लाडू बनविले जात असून आता रोज ही संख्या वाढत जाऊन पुढील आठवड्यात रोज दीड लाख लाडू बनविण्याचे उद्दिष्ट ठेऊन कामाला सुरुवात केली जाणार आहे. हे लाडू बनविण्यासाठी चांगल्या दर्जाची चणा डाळ, साखर, शेंगदाणा तेल, काजू, बदाम आणि वेलदोडे याचा वापर करण्यात येत आहे. साधारण 100 किलो चणा डाळ, 150 किलो साखर, 15 किलो तेल, 2 किलो काजू, 2 किलो बदाम आणि वेलदोडे घालून 1 क्विंटल मध्ये 5200 लाडू बनविले जातात. हे लाडू बनवायला मंदिर समितीला साधारण 35 हजार रुपये खर्च येतो आणि भाविकांना लाडू विक्रीतून मंदिराला साधारण 52 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
advertisement
आषाढी एकादशीच्या उपवासाला बुंदीचा लाडू प्रसाद खाता येत नाही. यासाठी 5 लाख राजगिऱ्याचे लाडू बनविण्याचेही काम सुरू असून एकादशी दिवशी हा प्रसाद भाविकांना खाता येईल आणि बुंदीचा प्रसाद गावाकडे नेता येईल, अशी व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. सध्या आषाढीसाठी लाडू बनविण्याचे काम सुरू असताना रोजच्या होणाऱ्या विक्रीसाठीही वेगळे लाडू बनवावे लागत आहेत. त्यामुळे मंदिर समितीने आता लाडू बनविण्याचा वेग वाढविण्यासाठी जादा कामगार लावण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
भाविकांना दिला जाणारा हा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. बनवलेले लाडू वळण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची मदत घेण्यात आली असून भाविकांना हा प्रसाद कमी पडणार नाही याची काळजी मंदिर समिती घेत आहे. सध्या रोज हजारोंच्या संख्येनी लाडू बनविणे सुरू असून जास्तीत जास्त भाविकांना हा प्रसाद मिळावा, यासाठी विविध ठिकाणी हे लाडू विक्रीसाठी मंदिर समितीने स्टॉल उभारले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 02, 2024 4:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2024: आषाढी यात्रेसाठी 11 लाख बुंदीचे लाडू बनवण्याच्या कामाला वेग; भाविकांकडून मोठी मागणी


