Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल प्रकरणात भाजप आमदाराचा विरोध, रुग्णालयातून थेट रहिवाशांच्या भेटीला, सरकारकडे मागणी काय?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
Elphinstone Bridge : भाजप आमदारांनीदेखील विरोध केला आहे. रुग्णालयात दाखल असतानाही वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी रहिवाशांची भेट घेतली.
मुंबई: शिवडी कनेक्टर पूल उभारण्यासाठी आज रात्रीपासून एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. या पाडकामाला रहिवाशांनी पुनवर्सनाच्या मुद्यावर विरोध केला होता. त्यानंतर आता भाजप आमदारांनीदेखील विरोध केला आहे. रुग्णालयात दाखल असतानाही वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी रहिवाशांची भेट घेतली.
मुंबईतील परेल आणि प्रभादेवी परिसराला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा एलफिन्स्टन पूल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाच्या कामामुळे काही इमारती बाधित होणार आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पुनवर्सनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधित होणार आहे. या दोन इमारतींमधील रहिवाशी प्रकल्पग्रस्तांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी होती.
advertisement
यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण 19 इमारती बाधित होणार होत्या पण MMRDAने रचनात्मक बदल करून 17 इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला , ज्यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर सुमारे पुनर्वसनावर होणारा 5200 कोटी रुपयांचा खर्च वाचवला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल.
advertisement
रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर स्थानिक नागरिकांचे जवळच पुनवर्सन करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानंतर आज सकाळी एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयावर भाजप आमदार कालिदास कोळबंकर यांनी आक्षेप घेतला आहे. पुलाच्या नव्या बांधकामाला त्यांनी विरोध नसल्याचे स्पष्ट केले, मात्र या प्रक्रियेत बाधित होणाऱ्या स्थानिकांना लिखित स्वरूपात योग्य आश्वासन मिळाले पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
advertisement
आमदार कोळंबकरांची मागणी काय?
आमदार कालिदास कोळबंकर यांनी सांगितले की, पूल पाडल्यामुळे 19 इमारतींतील रहिवासी बाधित होणार आहेत. या सर्वांना त्याच ठिकाणी 620 चौरस फुटांचे पुनर्वसन घरे उपलब्ध करून देण्याचे लिखित आश्वासन प्रशासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. प्रकृती अस्वस्थामुळे कोळबंकर सध्या रुग्णालयात दाखल आहेत. तरीदेखील त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी रुग्णालयातूनच भेट दिली.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी कोणते आश्वासन दिले होते?
येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, रहिवासी आणि एमएमआरडीए अधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी स्थानिकांच्या मागणीला प्रतिसाद देताना दिलासा दिला आहे. लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. लक्ष्मी निवास इमारतीमधील 60 प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील 23 प्रकल्पग्रस्त अशा एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 10:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल प्रकरणात भाजप आमदाराचा विरोध, रुग्णालयातून थेट रहिवाशांच्या भेटीला, सरकारकडे मागणी काय?