कट्टर शिवसैनिक, शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते म्हणून ज्यांची ओळख होती त्यांनी जून 2022मध्ये शिवसेनेत सर्वांत मोठं बंड केलं आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा वेगळ्याच समीकरणाने तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लावला. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या या भूकंपाला कारणीभूत होते (Eknath Shinde) एकनाथ शिंदे. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं; पण शिवसेनेत अलीकडे ते नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. अखेर या नाराजीचा उद्रेक होऊन त्यांनी बंड केलं. ठाण्यातल्या शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या राजकीय धक्क्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला. विश्वासदर्शक ठरावापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास विलक्षण आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी सातारा (Satara) जिल्ह्यात महाबळेश्वरमधल्या दरे या गावी एका मराठा कुणबी कुटुंबात झाला. शिक्षणासाठी ते ठाण्यात आले आणि पुढे तीच त्यांची कर्मभूमीही झाली. ठाण्यात त्यांनी 11वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी मासे विकणाऱ्या एका कंपनीत काम करायला सुरुवात केली. उदरनिर्वाहासाठी ते ठाण्यातच रिक्षाही चालवायचे. वयाच्या 18व्या वर्षी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातले शिवसेनेचे सर्वेसर्वा आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हापासूनच ठाण्यातले दारूचे बार हद्दपार करणं असो किंवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरचं आंदोलन असो, एकनाथ शिंदे प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले. (Thane) आनंद दिघे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या किसाननगर इथल्या शाखाप्रमुखदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. 1997मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली. या निवडणुकीत भरघोस मतांनी ते विजयी झाले होते. ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही होते. 2004 साली त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून लढवली. तेव्हापासून सलग चार वेळा ते या मतदारसंघातून विजयी झाले. 2015 ते 2019 या काळात ते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते.
आंदोलनात आघाडीवर असलेले एकनाथ शिंदे मितभाषी, पण कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. कार्यकर्त्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्याचं आव्हान एकनाथ शिंदे यांनी पेललं ते त्यांच्या ‘मास बेस’मुळे. ऐन मोदी लाटेतही ठाण्यात शिवसेनेचं वर्चस्व कायम राहिलं. ठाणे शहरच नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्हा, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर ते अगदी नाशिकपर्यंत शिवसेना वाढवण्यात शिंदे यांचं मोठं योगदान आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण वयाच्या 56 व्या वर्षी पूर्ण केलं. वयाच्या 56 व्या वर्षी 77.25 टक्क्यांसह त्यांनी पदवी मिळवली.
आपल्या डोळ्यांसमोर पोटच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता; पण त्यांचे मार्गदर्शक आनंद दिघे यांनी त्यांना यातून बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी समाजकारण हेच आपलं आयुष्य मानलं. संकटात असलेल्या सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. कोरोना काळात ठाणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी केलेली वैद्यकीय मदत, चिपळूणच्या पुरासारख्या आपत्तीत मदतीला धावून जाणं अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आहेत.
आपणच बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार असल्याचा दावा शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केला होता. ‘सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवीन,’ हा शब्द बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता. उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देऊन एकनाथ शिंदे यांनी तो पूर्ण केला. आपल्यासोबत 40 आमदारांना घेऊन ते आधी गुवाहाटीत राहिले आणि त्यानंतर गोव्यातून भाजपसोबत सत्तेची गणितं जमवून ते थेट मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिंदे यांच्यावर शिवसेना फोडल्याचाही आरोप झाला; पण काही मोजके अपवाद वगळता शिवसेनेतले जवळपास सर्व आमदार, खासदार आणि स्थानिक स्तरावरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांना साथ दिली.