advertisement

आलिया भट्ट बातम्या (Alia Bhatt News)

तिच्यावर खूप विनोद झाले, तिच्या बुद्धीवरून मीम्स व्हायरल झाले, तिच्या अभिनय कौशल्याबद्दल शंका घेतली गेली; पण ती तिचं काम करतच राहिली आणि आता ती देशातली सर्वाधिक मानधन घेणारी अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं नाव (Alia Bhatt) आलिया भट्ट. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री सोनी राझदान (Soni Razdan) यांची मुलगी असलेल्या आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी झाला. मुंबईतल्या जमनाबाई नरसी शाळेत तिचं शालेय शिक्षण झालं. अभिनय, फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या आलियाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण 1999मध्ये झालं. आलियाकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचं सांगितलं जातं. महेश भट्ट यांच्या 'संघर्ष' या सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. लहानपणापासूनच आलियाला अभिनयाची आवड होती. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याचं तिने ठरवलं होतं.

2012 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student Of The Year) या सिनेमातून तिचं अभिनेत्री म्हणून करिअर सुरू झालं. सुरुवातीला तिच्या अभिनयावर बरीच टीका झाली. तिच्यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झाले. त्यानंतर 2014मध्ये आलेल्या 'हायवे' या चित्रपटामधल्या तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटिक पुरस्कारही मिळाला. यानंतर आलियाचे एकामागोमाग एक चित्रपट हिट झाले आणि देशातल्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणना होऊ लागली. 2014 मध्येच आलेल्या 'टू स्टेट्स,' 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटांमधल्या तिच्या कामाचंही कौतुक झालं. 2016 मध्ये आलेल्या 'डियर जिंदगी' या चित्रपटातल्या आलियाच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार शाहरुख खान होता.

2016 मध्येच आलेल्या 'उड़ता पंजाब' या चित्रपटातल्या अभिनयासाठी आलियाला अनेक पुरस्कार मिळाले. 'बद्रीनाथ की दुल्हनिया,' 'राजी,' 'गली बॉय' या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं. शाहीद कपूरबरोबर 'शानदार' या चित्रपटातही ती दिसली. 2022मध्ये आलेल्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमामुळे (Gangubai Kathiyawadi) आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली. मुंबईतली प्रसिद्ध वेश्या असलेल्या गंगूबाईच्या तिने साकारलेल्या भूमिकेचं जगभरात कौतुक झालं.

अभिनयाबरोबरच आलिया चांगली गायिकाही आहे. तिच्या चित्रपटातली सात गाणी तिनं गायली आहेत. त्यात ‘समझावां अनप्लग्ड’ या सुपरहिट गाण्याचाही समावेश आहे. 14 एप्रिल 2022 रोजी अभिनेता रणबीर कपूरबरोबर (Ranbir Kapoor) आलियाचा विवाह अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत झाला. या विवाहाची जोरदार चर्चा झाली. रणबीर आणि आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपटही 2022मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली. अभिनय आणि गाण्याशिवाय आलियाने तिची स्वत:ची कपडे आणि हँडबॅग्जची लाइन लाँच केली आहे. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. 2014नंतर 'फोर्ब्ज इंडिया'च्या 100 सेलिब्रिटीजच्या यादीत तिचा सातत्याने समावेश होत आहे. 2017मध्ये 30 वर्षांखालच्या फोर्ब्ज एशिया यादीमध्येही तिचा समावेश झाला होता.

आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. महेश भट्टसारखे प्रसिद्ध दिग्दर्शक वडील असूनही तिनं त्यांच्या चित्रपटांतून पदार्पण केलं नाही. तिला शाहीन नावाची एक मोठी बहीण आहे. पूजा आणि राहुल भट्ट ही तिची सावत्र भावंडं आहेत. आलिया सोशल मीडियावरही भरपूर अ‍ॅक्टिव्ह असते. तिला प्राण्यांची खूप आवड असून, तिच्याकडे मांजर आहे. 19व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने स्वत:च्या हिमतीवर स्वत:चं घर घेतलं आहे. 6 नोव्हेंबर 2022 रोजी आलियाने मुलीला जन्म दिला.

पुढे वाचा …

सर्व बातम्या

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स