इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट (Cricket) स्पर्धा ही अल्पावधीतच क्रिकेटविश्वातली सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक लीग ठरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल समितीतर्फे दर वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जात असून, 2022 अखेरपर्यंत या स्पर्धेचे पंधरा मोसम पार पडले आहेत.
आयपीएल (IPL) ही अनेकार्थांनी क्रिकेटमध्ये नवे पायंडे पाडणारी स्पर्धा ठरली आहे. फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांमध्ये लीग स्पर्धा प्रचलित आहेत. युरोपमधल्या जवळपास प्रत्येक देशाची स्वतंत्र फुटबॉल लीग असून, त्यांपैकी काही स्पर्धांना 50 ते 100 वर्षांहून अधिक इतिहास आहे. क्रिकेटमध्ये मात्र इंग्लंडमधल्या कौंटी स्पर्धेचा अपवाद वगळल्यास आयपीएलपूर्वी जगभरातल्या क्रिकेटपटूंना सामावून घेणारी कोणतीच व्यावसायिक लीग अस्तित्वात नव्हती. कसोटी आणि वन-डे या क्रिकेटच्या प्रकारांमुळे अशा प्रकारच्या लीग आयोजित करण्यावर मर्यादा येत होत्या. टी-20 क्रिकेटच्या आगमनानंतर मात्र हे चित्र वेगाने बदललं. 2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं. हा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला आणि त्याच वेळी क्रिकेटच्या या प्रकाराला मिळणाऱ्या लोकप्रियतेचीही चुणूक दिसली.
बीसीसीआयचे (BCCI) तत्कालीन उपाध्यक्ष ललित मोदी यांनी यातली व्यावसायिक संधी ओळखली आणि 2008 पासून भारतात आयपीएलचं आयोजन करण्याची घोषणा केली. त्यानंतरची चक्र वेगानं फिरवण्यात आली. भारतातल्या प्रमुख आठ ठिकाणांच्या टीम्स तयार करून त्यांच्या फ्रँचायझी हक्कांसाठी निविदा काढण्यात आल्या. या टीम्सचे हक्क भारतातल्या काही मोठ्या उद्योगसमूहांनी आणि बॉलिवूडमधल्या बड्या सेलेब्रिटीजनी घेतल्यामुळे आपसूकच या स्पर्धेला पैसा आणि वलय प्राप्त झालं. त्यानंतर, बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या अग्रगण्य क्रिकेटपटूंना या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी राजी केलं आणि खुल्या लिलावामध्ये बोली लावून विविध टीम्सनी या खेळाडूंना करारबद्ध केलं. या स्पर्धेच्या आयोजनासाठी एप्रिल-मे महिन्यांतला कालावधी निश्चित करण्यात आला. आयसीसी (ICC), तसंच अन्य देशांच्या क्रिकेट संघटनांमध्ये आपलं वजन वापरून बीसीसीआयने या काळात कमीत कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होईल अशी तजवीज केली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून अगदी पहिल्या मोसमापासूनच आयपीएल ही क्रिकेटविश्वातली अद्वितीय स्पर्धा ठरली.
मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली आजवरची सर्वांत यशस्वी टीम असून, या टीमने आयपीएलचं विजेतेपद पाच वेळा पटकावलं आहे. त्याखालोखाल, चेन्नई सुपरकिंग्जने चार वेळा, कोलकाता नाइट रायडर्सने दोनदा, डेक्कन चार्जर्स व सनरायझर्स हैदराबाद या हैदराबादच्या दोन टीम्सनी एकूण दोन वेळा, तर राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स या टीम्सनी प्रत्येकी एकदा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. सुरुवातीला आठ टीम्समध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत नंतर दोन अतिरिक्त टीम्सना प्रवेश देण्यात आला. भारतातल्या विविध शहरांमध्ये रंगणारी ही स्पर्धा 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. त्याचप्रमाणे, 2014, 2020 व 2021 या वर्षांमध्ये स्पर्धेतल्या मॅचेस संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमुळे भारतातल्या क्रिकेटविषयक पायाभूत सुविधांमध्ये काही आमूलाग्र बदल घडून आले. भारतातल्या क्रिकेट स्टेडियम्सची निगराणी, नवीन क्रिकेट स्टेडियम्सची निर्मिती यांसाठी ही स्पर्धा पूरक ठरली आहे. उदयोन्मुख खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याकरिता ही स्पर्धा महत्त्वाचं व्यासपीठ ठरली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळालेल्या बऱ्याच खेळाडूंनी पुढे आपल्या देशाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान गाजवलं. भारताची बेंच स्ट्रेंग्थ बळकट करण्यासाठीही ही स्पर्धा उपयुक्त ठरली.
आयपीएलला वेळोवेळी वाद आणि टीकांचाही सामना करावा लागला. 2013 सालच्या स्पर्धेमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आणि फिक्सिंगच्या प्रकरणामुळेच राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन टीम्सवर दोन वर्षांची बंदीही घालण्यात आली. फिक्सिंगचे धागेदोरे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या जावयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनाही अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. आयपीएलमुळे टी-20 क्रिकेटला झुकतं माप मिळत असून, कसोटी व वन-डेकडे, तसंच अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांकडे बीसीसीआयचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात येते.