दिवाळी (Diwali) म्हणजेच दीपावली हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. दीपावली सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. श्रीराम वनवास संपवून सीतेसह याच काळात अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी म्हणून प्रजेने दीपोत्सव साजरा केला असं मानलं जातं. आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या काळात दीपावली साजरी केली जाते. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची ओळीने केलेली रचना म्हणजेच दिवाळी. दीपावलीच्या काळात घरावर आकाशदिवे-आकाशकंदील लावले जातात. अंगणात, खिडक्या-दरवाज्यांमध्ये पणत्या लावल्या जातात. दाराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात. चांगल्याची वाईटावर मात याचं प्रतीक म्हणजे दीपावली असं म्हणतात. शरद ऋतूमध्ये आश्विन महिन्याच्या शेवटी आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला हा सण येतो. पावसाळा संपून नवीन पीक हाती आलेलं असतं. त्यामुळे शेतकरी वर्गासह सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं.
वसुबारस (Vasubaras), धनत्रयोदशी (Dhanatrayodashi), नरक चतुर्दशी (Narakchaturdashi), लक्ष्मीपूजन (Laxmipujan), बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा (Padwa) आणि भाऊबीज (Bhaubij) असे दिवाळीचे दिवस असतात. आश्विन वद्य द्वादशीला वसुबारस साजरी केली. जाते. यालाच गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी गायीची वासरासह पूजा करतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूसाठी हे व्रत केलं जातं असं म्हणतात. गायी-गुरं असणाऱ्यांकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. काही ठिकाणी स्त्रिया उपवास करतात. बाजरीची भाकरी, गवारीची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो.
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशीचा. समुद्रमंथनातून लक्ष्मी प्रकट झाली आणि धन्वंतरी बाहेर आला असं म्हणतात. या दिवशी घरातले दागिने, सोनं-नाणं यांची पूजा केली जाते. आयुर्वेद शिकलेले वैद्य या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. धन्वंतरीला वैद्यकशास्त्राची देवता असं म्हटलं जातं. हा दिवस भारतात आता राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला महाराष्ट्रात स्त्रियांचं नहाण असतं. पहाटे स्त्रिया डोक्याला, अंगाला सुवासिक तेल लावून, उटणं लावून स्नान करतात.
दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा असतो. हा दिवाळीचा मुख्य दिवस. याच दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला. त्याचं स्मरण म्हणून अनेक ठिकाणी सकाळी कारटं नावाचं काकडीवर्गीय कडू फळ पायाच्या अंगठ्याने फोडलं जातं. या दिवशी पहाटे घरातले पुरुष, लहान मुलं यांना घरातल्या महिला सुवासिक तेल लावतात. त्या दिवशी उटणं लावून अभ्यंगस्नान केलं जातं. या दिवशी पहाटे खासकरून महाराष्ट्रात फटाके उडवण्याची पद्धत आहे. या दिवशी रेडिओवर खास कीर्तनही हमखास प्रसारित केलं जातं.
दिवाळीचा चौथा दिवस लक्ष्मीपूजनाचा. हे संपूर्ण देशभरात साजरं केलं जातं. लक्ष्मी चंचल असते. ती आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी अमावस्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं. व्यापाऱ्यांसाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला काही ठिकाणी साखरेची चित्रं आणून त्यांची पूजा करतात. साळीच्या लाह्या, बत्ताशांचा नैवेद्य या दिवशी दाखविला जातो. नवीन केरसुणी आणून तिला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते.
महाराष्ट्रात दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचा असतो. या दिवशी बळीराजाचं चित्र काढून त्याची पूजा करतात. या दिवसापासून नवीन विक्रम संवत्सर सुरू होतं. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. व्यापाऱ्यांचं नवीन वर्ष याच दिवशी सुरू होतं. काही ठिकाणी गोवर्धन पूजा केली जाते. महाराष्ट्रात या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला काही तरी भेट देतो.
भाऊबीज अर्थात यमद्वितीया हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला प्रेमाचं प्रतीक म्हणून काही तरी भेट देतो.
महाराष्ट्रात दिवाळीला मुलं मातीचा किल्ला करतात. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांसह त्यांच्या मावळ्यांची मातीची चित्रं लावली जातात. अन्य कुठेही ही पद्धत नाही. तसंच चकली, चिवडा, शंकरपाळे, अनारसे, करंज्या, चिरोटे, कडबोळी, लाडू, शेव असा फराळ करून त्याचा स्वतः तर आस्वाद घेतला जातोच; पण आप्त, मित्र-मैत्रिणी, शेजारी अशा सर्वांकडेही दिला जातो. एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या जातात. फटाके फोडले जातात.
महाराष्ट्रात वसुबारसेपासून ते भाऊबीज आणि पुढे तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी अंकांची (Diwali) समृद्ध परंपरा आहे. अन्य कुठेही ही परंपरा नाही. दिवाळीमध्ये साहित्याची मेजवानी असलेले 800हून अधिक अंक काढले जातात. दिवाळी पहाट म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही दिवाळीच्या दिवसांत अनेक ठिकाणी केलं जातं. दिवाळी म्हणजे किल्ला, फटाके, आकाशदिवे, फराळ, पणत्या आणि रांगोळ्या असं समीकरण महाराष्ट्रात आहे.