advertisement

सचिन तेंडुलकर बातम्या (Sachin Tendulkar News)

जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे क्रिकेट (Cricket) पोहोचलं आहे, तिथे तिथे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे नाव पोहोचलं आहे. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही सचिन तेंडुलकरचं नाव माहीत नसणारा क्रिकेटप्रेमी सापडणं मुश्कील. आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सचिनने क्रिकेटमधले अनेक विक्रम व यशोशिखरं पादाक्रांत केलीच आणि आपल्या खेळाने क्रिकेटलाही नवी उंची प्राप्त करून दिली.

सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये 24 एप्रिल 1973 रोजी झाला. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर स्वतः क्रिकेटपटू होता. त्याने सचिनला वयाच्या अकराव्या वर्षी प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांकडे नेलं. आचरेकर सरांनी सचिनला प्रशिक्षण देण्याचं मान्य केलं आणि तिथूनच सचिनच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रवेश झाला. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करता यावा, म्हणून सचिनने दादरमधल्याच शारदाश्रम शाळेमध्ये प्रवेश घेतला. शालेय क्रिकेटपासूनच सचिनच्या गुणवत्तेची चुणूक दिसली. हॅरिस शिल्ड स्पर्धेमध्ये त्याने नाबाद त्रिशतक ठोकताना विनोद कांबळीसोबत 664 रन्सची विक्रमी भागीदारीही केली होती. 1988मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबई संघातर्फे प्रथमच रणजी करंडक स्पर्धेत खेळताना सचिनने शतक ठोकलं आणि पदार्पणात शतक करणाऱ्या सर्वांत कमी वयाच्या खेळाडूचा विक्रम आपल्या नावावर केला. या रणजी मोसमात पाचशेहून अधिक धावा करून सचिनने अवघ्या सोळाव्या वर्षीच भारतीय टीममध्ये स्थान पटकावलं.

नोव्हेंबर 1989 मध्ये सचिनने भारतीय टीमकडून पाकिस्तानविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या पुढच्या वर्षी भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्यात सचिनने पहिलं आंतरराष्ट्रीय कसोटी शतक (Century) झळकावलं. सचिनने कारकिर्दीत पूर्ण केलेल्या शतकांच्या विश्वविक्रमी शतकांची (World Record) ही पहिली पायरी होती. सचिनने कसोटी कारकिर्दीत 200 मॅचेसमध्ये 15,921 रन्स केल्या असून, त्यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे. वन-डे क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावण्यासाठी मात्र सचिनला पुढची चार वर्षं वाट पाहावी लागली. वन-डे क्रिकेटमध्ये सुरुवातीची काही वर्षं सचिन मधल्या फळीत बॅटिंग करायचा. 1994मध्ये प्रथमच सलामीला बॅटिंगची संधी मिळाल्यावर त्याने वन-डेतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. सचिनने वन-डे कारकिर्दीमध्ये 463 मॅचेसमध्ये 49 शतकांसह 18,426 रन्स केल्या आहेत. टेस्ट आणि वन-डे या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅचेस, सर्वाधिक रन्स व सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. 1998 मध्ये सचिनने 9 शतकांसह 1894 धावा केल्या असून, हासुद्धा ‘वन-डे’मध्ये एका वर्षातल्या सर्वाधिक वैयक्तिक रन्स व शतकांचा विक्रम आहे. 2010 साली सचिनने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधलं पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं. भारताच्या 2011च्या वन-डे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा तो सदस्य होता.

सचिनने कारकिर्दीत दोन वेळा भारतीय टीमचं कर्णधारपदही भूषवलं आहे. कारकिर्दीमध्ये सचिनला अनेकदा दुखापतींचा सामनाही करावा लागला. त्यांपैकी पाठीची दुखापत आणि 2004 मधली ‘टेनिस एल्बो’ ही कोपराची दुखापत गंभीर होती; मात्र प्रत्येक वेळी सचिनने दुखापतींवर यशस्वीरीत्या मात केली असून, त्यानुसार आपल्या बॅटिंगच्या शैलीत आवश्यक बदलही केले. क्रिकेटमधल्या जवळपास सर्व पुरस्कारांवर सचिनने नाव कोरलं आहे. सचिनने वन-डेमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा (62) आणि मालिकावीराचा (15) पुरस्कार पटकावला आहे. भारत सरकारने त्याला 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार, तर 1998 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला होता. 1997 साली त्याची निवड ‘विस्डेन’च्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या यादीत झाली होती.

नोव्हेंबर 2013 मध्ये सचिन मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरची मॅच खेळून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच दिवशी भारत सरकारने त्याला भारतरत्न सन्मान जाहीर केला. भारतरत्न प्रदान करण्यात आलेला सचिन हा पहिलाच खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने राष्ट्रपतिनियुक्त राज्यसभा खासदार म्हणूनही काम केलं आहे. सचिनच्या पत्नीचं नाव अंजली असून, त्याला सारा ही मुलगी आणि अर्जुन हा मुलगा आहे. अर्जुन हा वेगवान गोलंदाज असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. ‘प्लेइंग इट माय वे’ हे सचिनचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे.

पुढे वाचा …

सर्व बातम्या

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स