आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडे नेहमीच गुणवान बॅट्समनची खाण म्हणून पाहिलं जातं. विजय हजारेंपासून ते सुनील गावसकर, सचिन तेंडुलकरपर्यंत भारताच्या एकापेक्षा एक बॅट्समन्सनी क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) हे या यादीतलं नवं नाव असून, दशकभरातल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विराटने महान बॅट्समन्सच्या (Batsman) पंक्तीत स्थान पटकावलं आहे.
दिल्लीमध्ये 5 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेल्या विराटने वयाच्या नवव्या वर्षापासून क्रिकेटचे (Cricket) धडे गिरवण्यास सुरुवात केली. 2002-03 मध्ये पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेसाठी प्रथम दिल्लीच्या 15 वर्षांखालच्या टीममध्ये त्याची निवड झाली. त्यानंतर, 2004-05 मध्ये विजय मर्चंट करंडक स्पर्धेसाठी दिल्लीच्या 17 वर्षांखालच्या टीममध्येही त्याला निवडण्यात आलं. या स्पर्धेत त्यानं 2 दोन शतकांसह 7 मॅचेसमध्ये 757 रन्स केल्या होत्या. नोव्हेंबर 2006 मध्ये त्याने दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात कर्नाटकविरुद्धच्या मॅचपूर्वी एक दिवस त्याच्या वडिलांचं निधन झालं. तथापि, विराटने सामन्यातून माघार न घेता दुसऱ्या दिवशी 90 रन्सची खेळी करून आपली क्रिकेटप्रति असलेली निष्ठा दाखवून दिली. प्रथमश्रेणी क्रिकेटमधल्या कामगिरीच्या जोरावर विराटला भारताच्या 19 वर्षांखालच्या टीममध्येही स्थान मिळालं. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने 2008मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपचं विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावलं.
विराटने 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तंत्रशुद्ध बॅटिंग आणि सातत्याच्या जोरावर अल्पावधीतच वन-डे व टी-20 टीममधलं स्थान पक्कं करणारा विराट हा 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचाही सदस्य होता. 2011मध्येच त्याला भारताच्या टेस्ट टीममध्येही संधी मिळाली. भारतीय टीममधले दिग्गज निवृत्त झाल्यानंतर विराट टीमचा प्रमुख बॅट्समन बनला आणि ही जबाबदारी त्याने लीलया पेलली. विराटने 2022 पर्यंत 262 वन-डे मॅचेसमध्ये 43 शतकांसह 12,344 रन्स केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 102 मॅचेसमध्ये 27 शतकांसह 8074 रन्स जमा आहेत. टी-20 मध्ये त्याने 3712 रन्स करताना एक शतक झळकावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सचिन तेंडुलकरखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेमध्ये विराट 2008 पासून बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स टीमकडून खेळत आहे. या स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर असून, विराटने 2016च्या मोसमात 4 शतकांसह 973 रन्स केल्या होत्या. तो आठ वर्षं बेंगळुरू टीमचा कॅप्टनही होता. भारतीय टीमचा कॅप्टन (Captain) म्हणूनही विराटने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टेस्ट सीरिज जिंकली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 40 टेस्ट मॅचेस जिंकल्या असून, भारताच्या सर्वांत यशस्वी कॅप्टन्समध्ये त्याची गणना होते.
विराटच्या कारकिर्दीत चढ-उतारही आले आहेत. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. 2015 व 2019 वन-डे वर्ल्ड कपच्या सेमी-फायनल मॅचेस व 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचमध्ये झटपट आउट झाल्यानेही त्याला टीका सहन करावी लागली. नोव्हेंबर 2019 नंतर सुमारे पावणेतीन वर्षं त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलं नव्हतं. विराटचं मैदानावरचं आक्रमक वर्तन, स्लेजिंग, भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी असलेले मतभेद आदी कारणांमुळेही तो चर्चेत राहिला.
आयसीसीने 2011-2020 या दशकातल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूची सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी विराटला प्रदान केली. याशिवाय, विराटला 2017 व 2018 मध्ये आयसीसीचा वर्षातल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा, 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट कसोटीपटूचा, तर 2012, 2017 व 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट वन-डे खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारने विराटला 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार, तर 2018 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं. 2017 मध्ये त्याला पद्मश्री सन्मानानेही गौरवण्यात आलं. विराट 2017 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माशी विवाहबद्ध झाला. 2021 मध्ये तो पिता बनला असून, त्याच्या मुलीचं नाव वामिका असं आहे.