स्थानिक प्रश्नांची जाण, प्रसंगी प्रशासनाला अंगावर घेण्याची ताकद, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आंदोलन करण्याची हिंमत आणि प्रचंड गर्दी खेचणारं प्रभावी वक्तृत्व हे सगळे गुण असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे राज ठाकरे. त्यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला. श्रीकांत ठाकरे (Shrikant Thackeray) हे त्यांचे वडील, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे काका, प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे आजोबा. त्यामुळे संगीत, चित्रकला, वक्तृत्व असा वारसा त्यांना घरातूनच लाभला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवी घेतली. उत्तम व्यंगचित्रकार (Cartoonist) असलेल्या राज यांनी काही काळ साप्ताहिक मार्मिकमध्ये व्यंगचित्रकार म्हणून कामही केलं. राज ठाकरे यांच्या परिवारात त्यांची आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली आणि नातू किआन यांचा समावेश आहे.
राज ठाकरे यांनी 1997 मध्ये शिवसेना उद्योगसेना स्थापन करून राजकारणात प्रवेश केला. 1996 मध्ये मुंबईत जगप्रसिद्ध गायक मायकल जॅक्सन आणि लता मंगेशकर यांच्या झालेल्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन राज ठाकरे यांच्याकडे होतं. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांमधली लोकप्रियता, नेतृत्वगुण यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडेच दिली जाईल असं सगळ्यांनाच वाटत होतं; पण महाबळेश्वरमध्ये 30 जानेवारी 2003 रोजी झालेल्या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
2002 साली मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती. त्यापूर्वी युतीची सत्ता असल्याच्या काळात राज ठाकरे यांचं नाव रमेश केणी हत्या प्रकरणाशी जोडलं गेलं होतं. त्याचा फटका राज ठाकरे यांना बसला होता. कोहिनूर मिल प्रकरणातही त्यांचं नाव आलं होतं. 2003 नंतर राज ठाकरे शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा सगळीकडे होती. काही काळ कोषात गेलेल्या राज ठाकरे यांनी या काळात बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफीचं काम हाती घेतलं. नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाठवलं होतं. 2004 च्या निवडणुकीपूर्वी मुंबईत रेल्वे भरतीची परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना राज ठाकरे यांच्या भारतीय विद्यार्थी सेनेनं मारहाण केली होती.
शेवटी 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचं जाहीर केलं; पण पक्ष सोडला नाही. 18 डिसेंबर 2005 रोजी मात्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांची समजूत घालण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 2006 च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (Maharashtra Navnirman Sena – MNS) हा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली. ‘माझ्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी झाली आहे,’ हे राज ठाकरे यांचं त्या वेळचं वक्तव्य खूप गाजलं होतं. परप्रांतीयांचा मुद्दा, नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, टोलवाढ, मराठी भाषेचा मुद्दा यावर मनसेनं सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. 18 मार्च 2006 रोजी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या मनसेच्या पहिल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मराठीच्या मुद्द्याला अधोरेखित करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म नावाची एक सेक्युलर संकल्पना मांडली. याला प्रतिसाद म्हणूनच की काय 2009मध्ये पहिल्यांदाच लढवलेल्या निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली, तर पुण्यात मनसे हा प्रमुख विरोधी पक्ष बनला.
वाद आणि राज ठाकरे हे एक अतूट समीकरण आहे. 2008 मध्ये समाजवादी पार्टी आणि मनसेमध्ये चांगलाच संघर्ष झाला होता. चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्याचा आणि दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा आग्रह मनसेनं धरला. पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवण्यासाठी मनसेनं नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. राजकारणात नेहमीच आक्रमक, रोखठोक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंची दुसरी बाजू अत्यंत संवेदनशील कलावंत, हळवा माणूस अशी आहे. उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन झाल्यानंतर राज ठाकरे स्वत: गाडी चालवत त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आले होते. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांबद्दल जिव्हाळा असलेल्या राज ठाकरे यांनी किल्ले संवर्धनासाठीही पावलं उचलली आहेत. इतिहासाबद्दल प्रेम, वर्तमानातल्या राजकारणाची जाणीव आणि ‘भविष्यात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे’ हे ब्रीद असलेल्या राज ठाकरे यांचं राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.