advertisement

काही खगोलीय घटना नेहमीच कुतूहल जागं करणाऱ्या असतात. सूर्यग्रहण (Solar Eclipse) ही अशीच एक अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना. चंद्र (Moon) हा सूर्य (Sun) आणि पृथ्वीच्या (Earth) मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून पाहताना सूर्य झाकोळलेला दिसतो. या स्थितीला सूर्यग्रहण म्हटलं जातं. सूर्यग्रहण अमावास्येला घडतं; पण सर्वच अमावास्यांना (No Moon Night) सूर्यग्रहण दिसत नाही. ज्या अमावास्येला पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येते, त्याच अमावास्येला सूर्यग्रहण दिसतं. दर 18 महिन्यांनी जगातल्या कोणत्या ना कोणत्या भागात सूर्यग्रहण होतं असं म्हटलं जातं. 2022 या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी झालं.

पृथ्वीवरून पाहताना जेव्हा सूर्य चंद्रबिंबामुळे पूर्णपणे झाकलेला दिसतो, तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणं दिसतात. त्यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असं म्हणतात. ज्या वेळी सूर्याचा थोडाच भाग झाकला जातो, तेव्हा त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं. जेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो, पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर त्याची कडा एखाद्या बांगडीसारखी म्हणजे कंकणासारखी दिसते, तेव्हा त्या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जातं. अनेकदा कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्राच्या थेट सावलीखाली असलेल्या भागामध्ये ‘अग्निकंकण’ म्हणजे ring of fire दिसून येतं. म्हणजे सूर्याच्या भोवती एखादा अग्नीचा गोळा तयार झाला आहे असा भास होतो. भारतात आता यापुढचं कंकणाकृती सूर्यग्रहण 21 मे 2031 रोजी दिसणार आहे.

हिंदू धर्मातही (Hindu Religion) सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या सूर्यग्रहणाबद्दल आजही अनेक समज-गैरसमज आढळतात. चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहणाबाबत अधिक अंधश्रद्धा (Superstitions) आहेत. सूर्यग्रहणामध्ये सुतककाळ म्हणजे ज्या काळात काहीही करायचं नाही असा काळ 12 तास आधी सुरू होतो असं मानलं जातं. या काळात लहान मुलं, आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मानतात. त्यामुळे ग्रहणकाळात स्वयंपाक करू नये, जेवू नये, झोपू नये, तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत, काहीही चिरू अथवा कापू नये, प्रवास करू नये अशा गोष्टी आजही अनेक जण पाळतात. विशेषत: गर्भवती स्त्रियांनी तर ग्रहणकाळात एका खोलीच्या बाहेरही पडू नये असा सल्ला दिला जातो. या काळात अनेक मंदिरं आणि देवस्थानांचे दरवाजे बंद ठेवले जातात. धार्मिक कार्यं, शुभ कार्यं केली जात नाहीत. ग्रहण सुटलं, की मग स्नान करून दान करावं. तसंच, ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ ध्यानधारणा, जप यामध्ये घालवावा असं म्हटलं जातं.

खगोलप्रेमींसाठी मात्र सूर्यग्रहण ही एक पर्वणी असते. सध्या याबाबतची जागरूकताही वाढली आहे. त्यामुळे अनेक खगोलप्रेमी संस्था सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास आयोजन करतात. सूर्यग्रहण कधीही थेट डोळ्यांनी पाहू नये. ग्रहणकाळात अगदी थोडावेळ जरी सूर्यबिंबाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर डोळ्यांना इजा होते, अंधत्वही येऊ शकतं. त्यापेक्षा अ‍ॅल्युमिनाइज्ड मायलार, ब्लॅक पॉलिमर, वेल्डिंगसाठी वापरली जाणारी 14 नंबरची काच, विशेष प्रकारचे गॉगल्स, एक्सरे यांच्या माध्यमातून सूर्यग्रहण पाहिलं जावं असा सल्ला वैज्ञानिक देतात. समाजातले सूर्यग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी शाळकरी वयापासूनच गैरसमज दूर करण्याकरिता अनेक खगोलप्रेमी संस्था विशेष प्रयत्न करत आहेत.

पुढे वाचा …

सर्व बातम्या

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स