हिंदू धर्मामध्ये तुळशीला (Tulsi) अत्यंत पवित्र मानलं जातं. समुद्रमंथनातून अमृत निघालं आणि त्याचे काही थेंब पृथ्वीवर पडले तेव्हा त्यातून तुळशीचा जन्म झाला असं मानलं जातं.या तुळशीचा भगवान विष्णू (Vishnu Bhagvan) किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्ण (Shrikrishna) यांच्याशी विवाह लावला जातो. या पूजोत्सवाला तुळशीचा विवाहसोहळा म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न (Tulshi Marraige) करण्याची प्रथा आहे. तुळशीचं लग्न झाल्याशिवाय महाराष्ट्रात लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होत नाही. चार महिने निद्रिस्त असलेले भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला (कार्तिक एकादशी) निद्रेतून उठतात, तेव्हा तुळशीचं लग्न लावलं जातं. तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं.
विशेषत: कार्तिक महिन्याच्या द्वादशीला तुलसीविवाह करतात. तुळशीचं लग्न गोरज मुहूर्तावरच म्हणजे संध्याकाळीच लावलं जातं. तुलसीविवाह हे हिंदू धर्मामध्ये एक व्रत मानलं गेलं आहे. या व्रताने कन्यादानाचं फळ मिळतं अशी श्रद्धा आहे. पूर्वी मोठी अंगणं असायची. त्यात तुळशी वृंदावनही असायचं. आता तुळशी वृंदावनं नसली, तरी तुळस सहसा असते. महाराष्ट्रात या तुळशीच्या कुंडीला किंवा वृंदावनाला गेरू आणि चुन्याने रंगवतात. त्याभोवती रांगोळी काढतात, पणत्या लावतात. तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना तेल आणि हळद लावून स्नान घातलं जातं. आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आहे असं समजून हे सर्व केलं जातं.
या वेळी तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात. वृंदावनाशी ऊस, झेंडूची फुलं ठेवली जातात. या लग्नाच्या वेळी तुळशीच्या मुळाशी बोर, चिंच, आवळा म्हणजे या हंगामातली ताजी फळंही ठेवली जातीत. यानंतर कृष्ण आणि तुळशीची विधिवत पूजा केली जाते. बाळकृष्ण आणि तुळशीमध्ये अंतरपाट धरला जातो आणि मंगलाष्टकं म्हणून त्यांचा विधिवत विवाह लावला जातो. नंतर मंत्रपुष्पांजली, आरती केली जाते. घरात मुलगी असेल तर तिला कृष्णासारखा वर मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. या लग्नासाठी नातेवाईक, शेजाऱ्यांना आग्रहाचं आमंत्रण असतं. अनेक ठिकाणी लग्नासारखंच जेवणही असतं. दिवाळीतले फटाके तुळशीच्या लग्नासाठी म्हणून मुद्दाम ठेवले जातात. ते फटाके या वेळी उडवले जातात. सहसा या दिवशी प्रसादाला दहीपोहे, वाफवलेली हरभरा डाळ, अनारसे, तिळाचे लाडू असे श्रीकृष्णाचे आवडते पदार्थ असतात.
तुलसीविवाहाबद्दल आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. जालंदर (Jalandar) या राक्षसाची पत्नी वृंदा (Vrinda) ही अतिशय साध्वी, पतिव्रता होती. तिच्या पुण्याच्या प्रभावामुळे जालंदरला देवही हरवू शकत नव्हते. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरला हरवणं शक्य नाही हे देवांना माहिती होतं. त्यामुळे विष्णूंनी जालंदरच्या अनुपस्थितीत जालंदरचं रूप धारण केलं आणि त्याच्या महालात जाऊन वृंदेचं सत्त्वहरण केलं. हीच साध्वी वृंदा पुढे तुळशीरूपाने प्रकट झाली; पण देहत्याग करताना तिने विष्णूला शाळिग्राम होण्याचा शाप दिला. विष्णूंनीही तिला तुळशीचं रोप होण्याचा प्रतिशाप दिला; पण वृंदेच्या पातिव्रत्यामुळे संतुष्ट झालेल्या विष्णूंनी तुळशीची पूजा केली जाईल असा वरही तिला दिला. या घटनेची आठवण म्हणून शाळिग्रामाशी (Shaligram) म्हणजेच विष्णूंशी तुळशीचं लग्न लावलं जाईल असाही वर तिला दिला. तेव्हापासून तुलसीविवाह ही प्रथा अस्तित्वात आल्याचं मानलं जातं. त्याचबरोबर तुळस अत्यंत औषधी, गुणकारी आहे. ती जपली जावी, तिचं संवर्धन व्हावं यासाठीही तुळशीचं लग्न ही प्रथा असल्याचं सांगितलं जातं.
गोवा, दीव आणि दमणमध्ये तुलसीविवाह अगदी सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची आणि बाळकृष्णांची वाजतगाजत मिरवणूकही निघते.