मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारं नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. (Balasaheb Thackeray) महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होणाऱ्या गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. आयुष्यात एकदाही एकही निवडणूक न लढवलेल्या बाळासाहेब ठाकरे यांना ‘किंगमेकर’ म्हटलं जाई. 1999मध्ये आलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हाती होता असं म्हटलं जायचं. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचं सरकार आणण्याचं त्यांचं स्वप्न होतं. कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असलेल्या बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट असं संबोधलं जाई.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. केशव सीताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackarey) हे बाळासाहेबांचे वडील. त्यामुळे त्यांना घरातूनच मोठा वैचारिक वारसा मिळाला होता. त्यांच्या आईचं नाव रमाबाई ठाकरे. 13 जून 1948 रोजी मीनाताई यांच्याशी बाळासाहेबांचा विवाह झाला. बाळासाहेब आणि मीनाताईंना जयदेव, बिंदुमाधव आणि उद्धव अशी तीन मुलं. राजकारणात रोखठोक भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार होते. सामाजिक, राजकीय प्रश्नांवर ते आपल्या कुंचल्यातून फटकारे ओढत. 1950 मध्ये बाळासाहेब ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरीस लागले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासोबतही त्यांनी काही काळ काम केलं; मात्र तिथं त्यांचं मन रमेना.
‘फ्री प्रेस जर्नल’मधल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी 1960 साली स्वत:चं ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केलं. अगदी थोड्याच काळात ‘मार्मिक’ प्रचंड लोकप्रिय झालं. त्यानंतर 19 जून 1966 रोजी त्यांनी मराठी माणसाला समोर ठेवून ‘शिवसेना’ या संघटनेची स्थापना केली. मुंबईत राहूनही मराठी तरुणांना नोकरीपासून वंचित राहावं लागत होतं. त्याविरोधात आवाज उठविण्याच्या हेतूने शिवसेनेची स्थापना करण्यात आली. 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसऱ्याला शिवसेनेचा पहिला मेळावा शिवतीर्थावर झाला. तेव्हापासून शिवसेनेचा दसरा मेळावा, शिवतीर्थ, बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आणि भरपूर गर्दी हे समीकरणच झालं.
1960-70 च्या दशकात परप्रांतीयांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी “हटाओ लुंगी, बजाओ पुंगी” ही मोहीम सुरू केली होती. मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व या मुद्द्यांवर बाळासाहेबांनी नेहमी थेट आणि रोखठोक भूमिका घेतली. शिवसेना (ShivSena) म्हणजे रस्त्यावर उतरून केली जाणारी आंदोलनं असं समीकरण झालं होतं. बाळासाहेब ठाकरे हे असंख्य मराठी तरुणांच्या हृदयातले ताईत बनले होते. 23 जानेवारी 1989 रोजी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ची (Samaana) मुंबईतून सुरुवात झाली. बाळासाहेबांच्या स्वभावाप्रमाणे सुरुवातीपासूनच ‘सामना’ची भाषा अत्यंत आक्रमक, थेट आणि रोखठोक होती. 1999मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशींच्या रूपाने शिवसेनेचा नेता मुख्यमंत्री झाला.
असंख्य कार्यकर्ते हीच शिवसेनेची खरी ताकद आहे हे बाळासाहेब ओळखून होते. बाबरी मशीद प्रकरण आणि त्यानंतरच्या दंगलींवरून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोपही झाले होते; पण त्या प्रत्येक आरोपाला बाळासाहेबांनी निर्भीडपणे उत्तर दिलं होतं. स्वस्त झुणका भाकर योजना, झोपडपट्टीवासीयांना घरं, वृद्धांना सवलती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या सगळ्या योजना मूळ बाळासाहेबांच्या होत्या.
राजकारणात अत्यंत आक्रमक असलेल्या बाळासाहेबांना सर्वपक्षीय नेते मान देत असतं. एरव्ही राजकीय व्यासपीठावर विखारी टीका करणारे शरद पवार हे त्यांचे खास मित्र होते. अडचणीत असलेल्या अन्य पक्षांतल्या मित्रांसाठी बाळासाहेब नेहमीच धावून जात. क्रिकेट हादेखील बाळासाहेबांचा वीक पॉइंट होता; पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने होऊ नयेत यावर ते ठाम होते. संगीत, चित्रपट, कला क्षेत्रांचाही बाळासाहेबांनी सन्मान केला. पत्नी मीनाताई आणि मुलगा बिंदुमाधव यांचा मृत्यू यामुळे बाळासाहेब हळवे झाले होते. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. राजकारणात प्रत्यक्ष कोणत्याही पदावर नसलेले बाळासाहेब किंगमेकर होते असं म्हटलं जाई. देशातल्या प्रसिद्ध उद्योगपतींपासून राजकीय नेते, कलावंत, खेळाडू अशा सर्वच क्षेत्रांतल्या व्यक्ती बाळासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात असत.
अविरत चालणारी मुंबई थांबविण्याची ताकद असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झालं. त्यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता.