advertisement

रोहित शर्मा बातम्या (Rohit Sharma News)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2010 नंतरच्या दशकभरात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या आघाडीच्या भारतीय खेळाडूंपैकी रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एक आहे. धडाकेबाज बॅट्समन अशी ओळख असणाऱ्या रोहितची कामगिरी भारतीय टीमचा कॅप्टन (Captain) म्हणूनही उल्लेखनीय असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतही त्याने बरेच विक्रम रचले आहेत.

रोहितचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूरमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याचं बालपण बोरीवलीला आजोबा आणि काकांकडे गेलं. रोहित 12 वर्षांचा असताना काकांनीच त्याला प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या क्रिकेट (Cricket) शिबिरामध्ये दाखल केलं. रोहितमधली उपजत गुणवत्ता पाहून त्यांनी रोहितला शाळा बदलण्याचा आणि लाड स्वतः प्रशिक्षक असलेल्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. या शाळेचं शुल्क रोहितच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने लाड यांनी त्याला शिष्यवृत्तीही मिळवून दिली. ऑफ-स्पिनर म्हणून संघात दाखल झालेल्या रोहितला लाड यांनी ओपनिंग बॅट्समन (Opening Batsman) म्हणून संधी दिली. रोहितनेही प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवत सलामीला खेळताना पदार्पणातच शतक ठोकलं.

रोहितने 2005 मध्ये पश्चिम विभागातर्फे पदार्पण केलं, तर 2006 मध्ये तो भारत अ टीमतर्फे, तसंच रणजी करंडक स्पर्धेत मुंबई टीमतर्फे खेळला. त्या वर्षी रणजी स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळताना त्याने गुजरातविरुद्ध द्विशतक झळकावलं. या कामगिरीमुळे भारतीय टीमचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले आणि 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितने अर्धशतक ठोकलं होतं. भारतीय टीमने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर रोहितला भारताच्या वन-डे टीममध्येही स्थान देण्यात आलं. तथापि, सुरुवातीची काही वर्षं रोहित वन-डे टीममध्ये जम बसवू शकला नव्हता. परिणामी, 2011 च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी रोहितची भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.

टी-20 आणि वन-डे क्रिकेटमध्ये रोहित सुरुवातीची काही वर्षं मधल्या फळीतला बॅट्समन म्हणून खेळत असे. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर भारताचा तत्कालीन कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने रोहितला सलामीला बॅटिंगची संधी दिली. धोनीचा हा निर्णय रोहितच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. सलामीवीर म्हणून त्याने देदीप्यमान यश मिळवलं. वन-डे क्रिकेटमध्ये रोहितने 233 मॅचेसमध्ये 9376 रन्स केल्या असून, 29 शतकं झळकावली आहेत. यांपैकी 27 शतकं त्याने सलामीवीर म्हणून झळकावली असून, त्यामध्ये विश्वविक्रमी तीन द्विशतकांचाही समावेश आहे. वन-डे क्रिकेटमध्ये डावातल्या सर्वोच्च वैयक्तिक रन्सचा विक्रमही रोहितच्याच (264 धावा) नावावर आहे. 2019च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये रोहितने पाच शतकं झळकावून एकाच वर्ल्ड कपमधल्या सर्वाधिक वैयक्तिक शतकांचा विक्रमही आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स (3737) आणि सर्वाधिक शतकं (4) या दोन्ही विक्रमांवर रोहितचंच नाव आहे.

रोहितने 2013 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने कसोटी पदार्पणात शतक झळकावलं असून, आतापर्यंत 45 मॅचेसमध्ये 8 शतकांसह 3137 रन्स केल्या आहेत. त्याच वर्षी आयपीएल (IPLT20) स्पर्धेत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचं नेतृत्वही त्याच्याकडे आलं. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली असून, हासुद्धा एक विक्रमच आहे. 2020मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा तत्कालीन कॅप्टन विराट कोहली या पदावरून पायउतार झाल्यानंतर रोहितकडे प्रथम टी-20 टीमचं कर्णधारपद आलं. त्यानंतर वन-डे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणूनही त्याची निवड झाली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने 2022 च्या ऑक्टोबरपर्यंत मायदेशात एकही मालिका गमावलेली नाही.

रोहितला 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2019 या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट वन-डे क्रिकेटरच्या पुरस्कारासाठी रोहितची निवड केली. ‘विस्डेन’ नियतकालिकाने 2021 या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट पाच क्रिकेटपटूंच्या यादीत रोहितला स्थान दिलं होतं.

मुंबईकर रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 साली झाला असून तो सध्या 34 वर्षांचा आहे. रोहितनं 13 डिसेंबर 2015 रोजी रितिका सजदेहशी (Ritika Sajdeh) लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव सामिरा (Samaira Sharma) आहे.

पुढे वाचा …

सर्व बातम्या

advertisement
advertisement

सुपरहिट बॉक्स